सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:14 IST2025-11-24T16:12:59+5:302025-11-24T16:14:42+5:30
मतदार यादी अपडेटच्या नावाखाली 'SIR फॉर्म' स्कॅम सुरू. निवडणूक अधिकारी बनून OTP मागितला जात आहे. फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी ही आवश्यक माहिती त्वरित वाचा.

सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
देशभरात मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. यामुळे लोक घाबरून जात असून बळी पडत आहेत. SIR फॉर्म स्कॅम नावाच्या या फसवणुकीत, सायबर ठग स्वतःला निवडणूक अधिकारी किंवा BLO म्हणून सांगत आहेत व समोरील व्यक्तीला लुबाडत आहेत.
"तुमचे SIR व्हेरिफिकेशन अपूर्ण आहे आणि तुमचे नाव मतदार यादीतून त्वरित काढून टाकले जाईल.", असे सांगणारे फोन मतदारांना येऊ लागले आहेत. मतदार यादीतून नाव काढण्याच्या धमकीमुळे लोक घाबरून जात आहेत आणि याच गोष्टीचा फायदा गुन्हेगार घेत आहेत.
OTP ची मागणी
'व्हेरिफिकेशन' पूर्ण करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा, असे सांगितले जाते. हा OTP मिळाल्यावर गुन्हेगार तुमचा UPI ॲप, बँक खाती, ईमेल आणि सोशल मीडिया ॲक्सेस करून तुमची आर्थिक फसवणूक करतात.
काही प्रकरणांमध्ये, ठग 'SIR फॉर्म डाउनलोड करा' असे सांगून एक फेक लिंक किंवा APK फाईल पाठवतात. या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होतो आणि तुमचा डेटा चोरीला जातो. ज्या राज्यांत सीर प्रक्रिया सुरु आहे, त्या राज्यात जास्त उत्पात माजविला जात आहे. या राज्य सरकारांनी या फसवणुकीबाबत अॅडव्हायझरी जारी केली आहे.
नागरिकांनी काय करावे?
नागरिकांनी लक्षात ठेवावे की, निवडणूक आयोग कधीही फोनवर OTP किंवा बँक तपशील विचारत नाही, किंवा कोणतेही ॲप डाउनलोड करण्यास सांगत नाही. घाबरू नका, असा कॉल आल्यास त्वरित कॉल कट करा. OTP, पासवर्ड, PIN कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवा.