सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:47 IST2025-06-08T14:42:37+5:302025-06-08T14:47:43+5:30

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, केंद्र सरकारने राज्यांना कोविड व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. 

Beware! Corona is spreading, more than 6000 patients across the country; 'so many' people died in 24 hours | सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू

सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  सध्या रुग्णांची संख्या सध्या नियंत्रणात असली, तरी वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्यास आणि आवश्यक उपाययोजना त्वरित राबवण्यास सांगितले आहे.

देशात ६,१३३ सक्रिय रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात सध्या कोरोना विषाणूचे ६,१३३ सक्रिय रुग्ण आहेत, तर ६,२३७ रुग्णांनी संसर्गावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

दिल्लीसह दक्षिणेतील राज्यांतही रुग्णवाढ
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येही कोरोनाचे प्रमाण वाढत असून ६६५ सक्रिय प्रकरणांची नोंद झाली आहे. तर, केरळमध्ये ३, कर्नाटकमध्ये २ आणि तामिळनाडूमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये केरळमधील तिघांचे वय अनुक्रमे ५१, ६४ आणि ९२ वर्षे होते. कर्नाटकमधील दोन पुरुष रुग्ण ४६ आणि ७८ वर्षांचे, तर तामिळनाडूतील रुग्ण ४२ वर्षांचा होता. विशेष म्हणजे, गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेले सर्व रुग्ण पुरुष होते.

सुरुवातीपासून आतापर्यंत ६१ मृत्यू
जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे एकूण ६१ मृत्यू झाले आहेत. एकट्या दिल्लीमध्येच यावर्षी आतापर्यंत ७ जणांनी प्राण गमावले आहेत. रविवारी सकाळपर्यंत देशात ५,७५५ सक्रिय रुग्ण होते आणि ५,४८४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.

सरकारकडून सतर्कतेचा सल्ला
कोरोनाचे हे पुन्हा डोके वर काढणे लक्षात घेता, केंद्र सरकारने राज्यांना कोविड व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. 

तज्ज्ञांच्या मते, यावेळी कोरोना फारसा धोकादायक नसला तरी वयस्कर, आजारी आणि लहान मुलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण करणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करणे ही मूलभूत खबरदारी महत्त्वाची आहे.

Web Title: Beware! Corona is spreading, more than 6000 patients across the country; 'so many' people died in 24 hours