"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:56 IST2025-06-20T17:51:35+5:302025-06-20T17:56:32+5:30
महिलेने फ्लाईट अटेंडंट आणि केबिन क्रूला थेट प्लेन क्रॅश करण्याची धमकी दिल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली.

"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
बंगळुरूमधील कँपेगौडा विमानतळावर एका महिला प्रवाशाने खूप गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने फ्लाईट अटेंडंट आणि केबिन क्रूला थेट प्लेन क्रॅश करण्याची धमकी दिल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यानंतर फ्लाईट टेक ऑफ करण्याआधीच तिला विमानातून खाली उतरवण्यात आलं.
येलहंका येथील रहिवासी असलेली व्यास हिरल मोहनभाई नावाची एक महिला प्रवाशी १७ जून रोजी बंगळुरूहून सूरतला जाण्यासाठी कँपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) वर पोहोचली. जेव्हा ती सूरतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX2749F विमानात चढली, तेव्हा तिने तिचं सामान सीट क्रमांक २०F वर ठेवलं होतं, जी तिची सीट नव्हती.
सीटवर सामान ठेवण्यावरून वाद
केबिन क्रूने यानंतर महिलेला तिचं सामान काढण्याचा सल्ला दिला. तरीही तिने तसं करण्यास नकार दिला आणि एअरलाइन स्टाफशीशी भांडण केलं. महिलेने केबिन क्रू तसेच इतर प्रवाशांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे बोर्डिंग प्रक्रियेत व्यत्यय आला. याच दरम्यान महिलेने केबिन क्रूला प्लेन क्रॅश करण्याची धमकी दिली.
टेकऑफपूर्वीच विमानातून उतरवलं खाली
महिलेच्या कृतीमुळे परिस्थिती इतकी बिकट झाली की, विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिला टेकऑफपूर्वीच विमानातून खाली उतरवलं आणि विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातून उतरल्यानंतरही महिला विमानतळ कर्मचाऱ्यांशी वाद घालत राहिली. तिने पोलीस स्टेशनमधील एका महिला स्टाफवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. कँपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये महिलेविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.