IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 08:29 IST2026-01-09T08:29:27+5:302026-01-09T08:29:57+5:30
Bengaluru Traffic Jam Early morning : बेंगळुरूच्या दयनीय अवस्थेवर एका जुन्या रहिवाशाने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. खड्डे, ट्रॅफिक आणि पाणी प्रश्नावरून त्याने सरकारला धारेवर धरले. वाचा काय आहे हा व्हायरल प्रकार.

IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
बेंगळुरू: पुण्यातील आयटी हब हिंजवडीच्या वाहतूक कोंडीमुळे कंपन्या सोडून जात असताना ज्या शहरांत त्या जात आहेत, तिथे काही वेगळी परिस्थिती नाहीय. भारताची सिलिकॉन व्हॅली आणि IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरू शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शहरातील कोलमडलेली पायाभूत सुविधा, खड्डेमय रस्ते आणि न संपणारी ट्रॅफिक जाम याला कंटाळून एका व्यक्तीने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. त्याची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनीही "बेंगळुरू हळूहळू मरत आहे," अशी भावना व्यक्त केली आहे.
एका रहिवाशाने रेडिटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी बेंगळुरूमध्येच लहानाचा मोठा झालो. एकेकाळी नंदनवन वाटणारे हे शहर आता ढिगाऱ्यात रूपांतरित होताना मी पाहतोय." त्याने शहरातील रस्त्यांच्या स्थितीला 'दयनीय' म्हटले असून, सरकारी नियोजनाच्या अभावावर जोरदार टीका केली आहे. हा आयटी हब आहे की नरकाचे द्वार, असाही सवाल त्याने केला आहे.
पाहूनच भीती वाटावी अशी परिस्थिती
संबंधित रहिवाशाने काही धक्कादायक अनुभवही शेअर केले आहेत. पहाटे ३:३० वाजताही इंदिरानगर ते मान्यता टेक पार्क प्रवासासाठी तब्बल २ तास लागल्याचा दावा त्याने केला आहे. अनेक ठिकाणी बीम कोसळणे, पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळणे आणि वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे यामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुने प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी सरकार नवीन बोगदे आणि टॅक्स वाढवण्यावर भर देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर "भारतीय खेड्यांची अवस्था बेंगळुरूच्या अनेक भागांपेक्षा चांगली आहे," अशी टिप्पणी केली आहे.