मोठ्या पॅकेजचं आगार; भारतातल्या 'या' शहरात मिळतो सर्वाधिक पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 17:37 IST2018-11-22T17:26:10+5:302018-11-22T17:37:05+5:30
नेटवर्किंग, सॉफ्टवेयर आणि आयटी कंपन्यांमध्ये सर्वात जास्त रकमेचं पॅकेज

मोठ्या पॅकेजचं आगार; भारतातल्या 'या' शहरात मिळतो सर्वाधिक पगार
बंगळुरु: कर्मचाऱ्यांना सर्वाधिक पगार देणाऱ्या शहरांच्या यादीत बंगळुरु अव्वल आहे. तर सर्वाधिक पगार देणाऱ्या क्षेत्रांमध्ये नेटवर्किंग, सॉफ्टवेयर आणि आयटी या तीन क्षेत्रांचा क्रमांक वरचा आहे. लिंक्डइननं देशात पहिल्यांदाच पगाराचे आकडे लक्षात घेऊन याबद्दलचं सर्वेक्षण केलं आहे. जगातील ५ कोटी लोक लिंक्डइनशी जोडले गेलेले आहेत. यातील सर्वाधिक लोक अमेरिकेतील आहेत.
मुंबई, दिल्ली या शहरांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात, असा अनेकांचा समज असतो. मात्र लिंक्डइनच्या सर्वेक्षणानं हा समज खोटा ठरला आहे. या सर्वेक्षणासाठी लिंक्डइननं गेल्या दोन महिन्यांपासून आकडेवारी गोळा केली. यामधून बंगळुरु शहरात सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती समोर आली. देशाचं आयटी हब अशी ओळख असलेल्या बंगळुरुत आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतो. यानंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.
बंगळुरु शहरातील मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या पॅकेजची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. इथल्या कंपन्या एका कर्मचाऱ्याला वार्षिक सरासरी ११.६७ लाख रुपयांचं पॅकेज देतात. यानंतर मुंबई (९.०३ लाख रुपये) दुसऱ्या, तर दिल्ली-एनसीआर (८.९९ लाख रुपये) स्थानावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर हैदराबाद (८.४५ लाख रुपये) आणि पाचव्या स्थानावर चेन्नई (६.३० लाख रुपये) आहे. सर्वाधिक पगार देणाऱ्या क्षेत्रात हार्डवेयर आणि नेटवर्किंग कंपन्या आघाडीवर आहेत. याशिवाय सॉफ्टवेयर, आयटी कंपन्यादेखील कंपन्यांना भरघोस पगार देतात.