गरोदर बहिणीसह आई-वडिलांना मारून घरात पुरले; कारण ऐकून पोलिसही चक्रावले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:33 IST2026-02-01T18:31:45+5:302026-02-01T18:33:38+5:30
Man Killed Mother Father And Sister: हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना तिघे बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

गरोदर बहिणीसह आई-वडिलांना मारून घरात पुरले; कारण ऐकून पोलिसही चक्रावले...
Man Killed Mother Father And Sister: कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील विजयनगर परिसरात घडलेल्या एका तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. एका तरुणाने आपल्या आई, वडील आणि गरोदर बहिणीची हत्या करून त्यांचे मृतदेह घरातच पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
कौटुंबिक वादातून तिहेरी हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने बहिणीच्या वैयक्तिक आयुष्यावरून निर्माण झालेल्या वादातून हे कृत्य केले. आरोपीची 18 वर्षीय बहीण अमृता हिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, ज्यातून ती गरोदर झाली. बहिणीच्या या स्थितीला आई-वडिलांनीही पाठिंबा दिला. याचाच राग मनात धरून आरोपीने तिघांची हत्या केली. पोलिस चौकशीत आरोपीने कुटुंबाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
हत्या कशी घडली?
पोलिस तपासानुसार 26 जानेवारी रोजी आरोपीने आधी आईची हत्या केली आणि रक्ताने माखलेले कपडे नष्ट करून आंघोळ केली. त्याच दिवशी संध्याकाळी बहीण अमृता घरी आल्यानंतर तिची हत्या केली आणि मृतदेह आईजवळ ठेवून पुन्हा आंघोळ केली. रात्री साडेदहा वाजता दारू पिऊन घरी परतल्यानंतर सोफ्यावर बसलेल्या वडिलांचाही गळा चिरून खून केला आणि तिन्ही मृतदेह एकाच खोलीत ठेवून दाराला कुलूप लावले.
मृतदेह पुरण्याची योजना
आरोपी दुसऱ्या दिवशी बहिणीचा व आईचा मोबाईल घेऊन बंगळुरूला गेला. जयदेव रुग्णालयाजवळ फोटो काढून ते मोबाईलवर पाठवले आणि दोन्ही फोन कचऱ्यात टाकून दिले. यानंतर त्याने काका वसंत यांना भेटून सर्व घटना सांगितली. पुढे काकांनीच मृतदेह पुरण्याची आणि कुटुंब बेपत्ता असल्याचे भासवण्याची कल्पना दिली.
घरातच खड्डा खणून मृतदेह पुरले
27 जानेवारीच्या रात्री आरोपी परत कोट्टुरूला आला आणि घरातच खड्डा खणून आई-वडील आणि बहिणीचे मृतदेह पुरले. यानंतर तो पोलिस स्टेशनला गेला आणि तिघे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांना त्याच्यावरच संशय आल्याने, त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली. याप्रकरणी आरोपी अक्षय आणि त्याचा काका वसंत या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.