'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 19:43 IST2026-01-13T19:42:43+5:302026-01-13T19:43:17+5:30
Bengal Politics: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा SIR बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
Bengal Politics: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अलीकडेच कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी कोलकात्यातील I-PAC च्या कार्यालयावर छापेमारी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे. तसेच, मतदार याद्यांची सखोल तपासणी(SIR) च्या मुद्द्यावरुन केंद्रातील भाजपवर निशाणा साधला आहे.
हावडामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सीएम ममता बॅनर्जींनी आरोप केला की, निवडणूक आयोग भाजपच्या AI टूल्सचा वापर करुन मतदारांच्या आडनावात फेरबदल करतोय. SIR दरम्यान, निवडणूक आयोगाने त्या विवाहित महिलांचे नाव कापले, ज्यांनी लग्नानंतर आपल्या आडनावात बदल केला होता. अर्ध्या मतदारांची नावे तुम्ही कमी कशी करू शकता? या प्रश्नाचे आयोगाने उत्तर द्यावे.
ममतांनी बिहारचे उदाहरण देत आयोगाला विचारले की, बिहारमध्ये SIR साठी डोमिसाइल सर्टिफिकेटची परवानगी आहे, मग बंगाल का नाही? SIR नियमांनुसार, मायक्रो- ऑब्जर्वरची गरज नाही, मग बंगालमध्ये का तैनात केले? आयोग दररोज SIR चे नियम बदलत आहे. लोकशाहीत मतदार सरकार ठरवतो, मात्र आयोग मतदानाचा अधिकारच हिरावत असल्याचा आरोपही ममतांनी केला.