मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 08:47 IST2025-10-30T08:46:46+5:302025-10-30T08:47:21+5:30
उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये गेरुआ नदीत एक मोठी दुर्घटना घडली. गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली.

फोटो - ABP News
उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये गेरुआ नदीत एक मोठी दुर्घटना घडली. गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली. यामध्ये २२ जण बुडाले, १३ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं, तर आठ जण अजूनही बेपत्ता आहेत. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकं वेगाने बचावकार्य करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची दखल घेतली आहे.
बहराईचच्या सुजौली पोलीस स्टेशन परिसरातील गेरुआ नदीत ही धक्कादायक घटना घडली. रिपोर्टनुसार, लखीमपूर खेरी येथील खैरतिया बाजार येथून भरथापर येथील त्यांच्या घरी परतत असताना गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट अचानक एका झाडावर आदळली, अनियंत्रित झाली आणि उलटली. यामुळे २२ जण नदीत बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावातील लोकांनी १३ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं.
प्रशासनाने आठ जणांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकं नदीत तैनात केली. नेपाळमध्ये उगम पावणारी आणि उत्तर प्रदेशच्या मैदानातून वाहणारी गेरुआ नदी खूप खोल आहे. यामुळे बचाव पथकांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं. नदीतून बाहेर काढलेल्या एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुख्य विकास अधिकारी मुकेश चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच, सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक गोताखोरांना दोन स्टीमर वापरून बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफला त्वरित मदत आणि बचाव कार्य सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.