काम करण्यास दिला नकार; रस्त्याच्या मधोमध भिक्षा मागणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:28 IST2025-01-27T12:25:59+5:302025-01-27T12:28:56+5:30
मध्य प्रदेशात एका भिक्षेकऱ्याला पोलिसांनी तक्रारीनंतर अटक केली आहे.

काम करण्यास दिला नकार; रस्त्याच्या मधोमध भिक्षा मागणाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
MP Crime: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भिक्षा मागणाऱ्या विरोधात एफआयआर नोंदवल्याची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असतानाही हा भिकारी भीक मागतो, असा आरोप तक्रारदार व्यक्तीने केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी भिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. कमाईचा दुसरा कुठला मार्ग नसल्याने आपण भीक मागत असल्याचे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने सांगितले.
भोपाळच्या एमपी नगरमध्ये हा सगळा प्रकार घडला. एमपी नगरच्या झोन-२ चे पोलीस उपअधीक्षक संजय अग्रवाल यांनी सांगितले की, एक व्यक्ती तक्रार देण्यासाठी आली होती. तक्रार करणाऱ्याने सांगितले की, बोर्ड ऑफिस चौकाजवळ एका भिकाऱ्याने हात धरून भीक मागितली. भिकाऱ्याची शरीरयष्ठी पाहून तक्रारदाराने त्याने त्याला भीक मागण्याचे कारण विचारलं. तू शारीरिकदृष्ट्या निरोगी दिसतोय, मग तो भीक का मागत आहे, त्याऐवजी काही काम का करत नाही?, असा सवाल तक्रारदाराने केला.
यावर भिकाऱ्याने सांगितले की भीक मागणे हेच त्याचे काम आहे आणि यातूनच तो आपला उदरनिर्वाह करतो. यानंतर त्या व्यक्तीने एमपी नगर पोलीस ठाण्यात भिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्या आधारे मध्य प्रदेश भिकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्या भिकाऱ्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आणि त्याला पकडण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, भोपाळ शहरातील प्रमुख चौकात सिग्नल लाल होताच भिकारी पैसे मागत असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून येत होत्या. जर आपण त्यांची शारीरिक स्थिती पाहिली तर ते ठणठणीत असल्याचे दिसून येते. यानंतरही ते लोकांना अशा प्रकारे पैसे देण्यासाठ जबरदस्ती करतात. त्यामुळे लोकांनाही त्यांना भिक्षा द्यावी लागते. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, भिकारीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे. देशातील १० शहरांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. या शहरांमध्ये दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंदूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा आणि अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.