यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 06:08 IST2025-10-01T06:08:05+5:302025-10-01T06:08:20+5:30
खेळामध्ये यशस्वी कारकीर्द घडवायची असेल, तर प्रत्येकाने सर्वांत आधी मनातला आवाज ओळखायला शिकावे आणि स्वतःला समजून घ्यावे, असा मार्मिक सल्ला व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी उदयोन्मुख खेळाडूंना दिला.

यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
पुणे : 'परिस्थिती कशीही असो, कितीही संकटे समोर असोत. त्याला पाठ दाखवून पळू नका. तिच्याकडे संधी म्हणून बघा. त्याचा सामना करा. तसेच यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वतः प्रती प्रमाणिक राहा,' असा सल्ला माजी कसोटीपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी नवोदितांना दिला. क्रिकेटने आपल्याला आयुष्य कसे असते ते शिकवले हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
खेळामध्ये यशस्वी कारकीर्द घडवायची असेल, तर प्रत्येकाने सर्वांत आधी मनातला आवाज ओळखायला शिकावे आणि स्वतःला समजून घ्यावे, असा मार्मिक सल्ला व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी उदयोन्मुख खेळाडूंना दिला.
यावेळी महाराष्ट्र रणजी संघाचे
माजी कर्णधार सुरेंद्र भावे यांनी ५० वर्षीय लक्ष्मण यांची मुलाखत घेतली. त्यावेळी लक्ष्मण यांनी आपली क्रिकेट कारकीर्द उलगडून दाखविली. त्याचसोबत क्रिकेटने आपल्या आयुष्यात कसे धडे दिले तो प्रवासही उलगडला.
'लहानपणापासूनच मला क्रिकेटची आवड होती. माझे आई-वडील डॉक्टर होते. क्रिकेट निवडण्यासाठी त्यांनी मला पाच वर्षे दिली. या पाच वर्षांत यश मिळाले नाही, तर मलाही वैद्यकीय पेशाकडे वळावे लागणार होते. मात्र, मी मेहनत घेतली. मी किती धावा केल्या हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे नव्हते. मी माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती मेहनत घेत होतो, याला कुटुंबाने पाठिंबा दिला.'
बिल्कूल खचून जाऊ नका
आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचे उदाहरण देऊन त्यांनी उपस्थितांना खचून न जाण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, माझे रणजी पदार्पण निराशाजनक होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र, आयुष्यात नो-बॉल मिळतोच. म्हणजे जीवनदान मिळतेच. फक्त संधीचा फायदा घेता आला पाहिजे.
खेळाडूंचे कौशल्य पहावे
निवड समितीला सल्ला देताना ते म्हणाले, की खेळाडूंमधील कौशल्य बघायला शिकले पाहिजे. तेंडुलकरसारख्या व्यक्ती आयुष्यात होत्या. त्यामुळे कारकीर्द घडली. लक्ष्मण यांनी १३४ कसोटींत ४५.९७च्या सरासरीने ८७८१ धावा केल्या. ते ८६ वन-डे सामनेही खेळले. त्याचबरोबर २६७प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी ५१.६४च्या सरासरीने १९ हजार ७३० धावा केल्या.
देवधर यांच्या पुतळ्याचे औपचारिक अनावरण
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या वतीने विंचूरकर पॅव्हेलियनच्या नूतनीकरण वास्तूचे, प्रवेशद्वाराचे व पुतळ्याचे औपचारिक उद्घाटन व अनावरण माजी भारतीय क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांच्या हस्ते करण्यात आले. देवधर परिवारापैकी डॉ. दीपक आठवले, वृषाली आठवले आणि आदित्य पावनगडकर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, दीपक गाडगीळ, सारंग लागू, सुरेंद्र भावे, माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, अमित दोशी, क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, अविनाश रानडे, तन्मय आगाशे, सिद्धार्थ भावे, अभिषेक ताम्हाणे, निरंजन गोडबोले, विनायक द्रविड उपस्थित होते.