"मी चुलीवर स्वयंपाक करणार नाही"; सिलिंडरवरुन नवऱ्याशी वाद, बाळासह बायकोने सोडलं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 12:48 IST2026-03-22T12:46:11+5:302026-03-22T12:48:41+5:30
एका पत्नीने चुलीवर स्वयंपाक करण्यास नकार दिला आणि पतीकडे गॅस सिलिंडरची मागणी केली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये एका पत्नीने चुलीवर स्वयंपाक करण्यास नकार दिला आणि पतीकडे गॅस सिलिंडरची मागणी केली. मात्र पतीने सिलिंडर घेण्यास नकार दिल्याने संतापलेली पत्नी आपल्या ५ महिन्यांच्या बाळासह घर सोडून निघून गेली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पती तिचा शोध घेत आहे, परंतु अद्याप तिचा कोणताही पत्ता लागलेला नाही.
पत्नी जाताना स्वतःसोबत काही कपडे आणि घरात ठेवलेले १००० रुपये घेऊन गेली आहे. "माझी चूक झाली, मला माफ कर, पण घरी परत ये," अशी विनवणी पती आता करत आहे. हे संपूर्ण प्रकरण घुंघटेर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या बौधनी मजरे खटौली गावातील आहे. येथील अनिल कुमारचं दोन वर्षांपूर्वी सुमन देवीशी लग्न झालं होतं. त्यांना पाच महिन्यांचं एक बाळ आहे. अनिल एका खासगी कंपनीत कामाला आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता अनिल नाईट ड्युटी करून घरी परतला होता. घरी आल्यावर त्याने जेवण मागितलं असता, स्वयंपाक झाला नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. अनिलने जेव्हा याचे कारण विचारलं, तेव्हा पत्नीने त्याला ठणकावून सांगितलं की, "आता मी चुलीवर स्वयंपाक करणार नाही, मला सिलिंडर हवा आहे."
अनिलने दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने सिलिंडर मागितला होता आणि याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. वादानंतर अनिल आपल्या खोलीत झोपायला गेला. याच दरम्यान सुमन देवी आपले कपडे, १००० रुपये रोख आणि पाच महिन्यांच्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली. संध्याकाळी ४ च्या सुमारास जेव्हा अनिलला जाग आली, तेव्हा पत्नी आणि बाळ बेपत्ता असल्याचे त्याच्या लक्षात आलं. खूप शोध घेऊनही त्यांचा काहीच सुगावा लागला नाही. अखेर पोलिसांनी पतीच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.
अनिल कुमार भावूक होऊन म्हणाला, "माझ्याकडून जी काही चूक झाली असेल, ती माफ कर आणि घरी परत ये." अनिलने गेल्या तीन दिवसांत आपल्या नातेवाईकांकडे, मोहम्मदपुर खाला, टेढ़ावां, असगीनगर, उस्मानपुर आणि सीतापूर यांसारख्या विविध ठिकाणी शोध घेतला आहे, पण अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस ठाण्याचे प्रभारी बेचू यादव यांनी सांगितलं की, गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.