चडचण येथे बँकेवर दरोडा; लष्करी गणवेशात आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी २१ कोटींचा ऐवज लुटला, महाराष्ट्राच्या दिशेने पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:57 IST2025-09-18T11:56:48+5:302025-09-18T11:57:11+5:30
तपासासाठी पथके रवाना

चडचण येथे बँकेवर दरोडा; लष्करी गणवेशात आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी २१ कोटींचा ऐवज लुटला, महाराष्ट्राच्या दिशेने पलायन
विजयपूर/ जत/सोलापूर : विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर मंगळवारी सायंकाळी लष्करी गणवेशात आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना बांधून घालून २० किलो सोन्याच्या दागिने आणि १ कोटी ४० लाख रुपये रोख असा सुमारे २१ कोटींचा ऐवज लुटून नेला. या दरोड्याच्या तपासासाठी विजापूर आणि चडचण पोलिसांची चार पथके वेगवेगळ्या भागात रवाना झाली आहेत. या तपासात सोलापूर पोलिसही सहभागी झाले आहेत.
चडचण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी ही घटना घडण्यासाठी बनावट नंबर प्लेट असलेली व्हॅन वापरली. या घटनेनंतर ते महाराष्ट्रातील पंढरपूरकडे पळून गेले. वाटेत सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या कारचा अपघात झाला, ज्यामुळे त्यांची स्थानिक लोकांशी बाचाबाचीही झाली. तरीही, ते लुटलेले सामान घेऊन पळून गेले.
विजयपूरचे पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबारगी यांनी सांगितले की, या घटनेनंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी संयुक्त पथके तयार केली आहेत. बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे.
कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातल्या चडचणमध्ये मंगळवारी संध्याकाळी भारतीय स्टेट बँकेच्या एका शाखेत घुसून बुरखाधारी आणि सशस्त्र दरडोखोरांनी २० किलो सोने आणि १ कोटी ४० लाखाची रोकड असा सुमारे २१ कोटींचा ऐवज लुटून नेला.
कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले; शौचालयात कोंडले
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी सैनिकी गणवेशासारखे कपडे घातले होते आणि त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व धारदार शस्त्रे होती. त्यांनी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बँकेत प्रवेश केला आणि कर्मचाऱ्यांवर धाक दाखवत त्यांचे हात-पाय प्लास्टिकच्या पिशव्यांनी बांधले. बँक मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांना शौचालयात कोंडून ठेवण्यात आले. ग्राहकांनाही ओलीस ठेवण्यात आले.
मॅनेजरला धमकावून ऐवज काढून घेत पोबारा
दरोडेखोरांनी बँकेत घुसताच “पैसे बाहेर काढ, नाहीतर जीवे मारू,” असे बँक मॅनेजरला धमकावले. नंतर त्यांनी कॅश व्हॉल्ट आणि सोन्याचे लॉकर उघडायला लावले. ग्राहकांनी जमा केलेले दागिने आणि बँकेतील रोकड पिशव्यांमध्ये भरून त्यांनी पोबारा केला.
नाकेबंदी आणि शोधमोहीम
विजयपूरचे पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांच्यासह त्यांच्या पथकास पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार मंगळवेढा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली; मात्र दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांच्या शोधकार्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून आवश्यक ती मदत पुरवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
दरोडेखोरांनी जीप हुलजंती येथे सोडली
विजयपूर जिल्ह्यातील चडचण (कर्नाटक) येथील स्टेट बँकेवर मंगळवारी सायंकाळी धाडसी दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांनी गुन्ह्यातील जीप हुलजंती येथेच टाकून पलायन केले. विजयपूर पोलिसांनी जीपमधील मुद्देमाल हुलजंती येथून ताब्यात घेतला. दरम्यान, दरोडेखोरांच्या शोधासाठी मंगळवेढा आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिमतीला देण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बुधवारी सांगितले.