'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 12:02 IST2025-07-23T12:00:56+5:302025-07-23T12:02:12+5:30
Bangladesh Plane Crash: लोकांचा राग पाहता काही वेळानंतर पोस्ट डिलीट करावी लागली.

'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
Bangladesh Plane Crash: बांग्लादेशची राजधानी ढाका येथे झालेल्या विमानअपघातानंतर देशाचे प्रमुख मोहम्मद युनूस यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अपघातानंतर युनूस यांनी फेसबुक पोस्टद्वारे देशवासीयांना दान देण्याचे आवाहन केले होते. हे पैसे माइलस्टोन स्कूलवर झालेल्या अपघातातील मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी वापरण्यात येणार होते.
मात्र, मोहम्मद युनूस यांच्या या पोस्टमुळे बांग्लादेशमध्ये राजकीय गोंधळ निर्माण झाला. अपघातातील बळींना मदत करण्यासाठी युनूस सरकारकडे पैसे नसल्यावरुन अनेकांनी टीका केली. हा वाद इतका वाढला की, मोहम्मद युनूस यांना ही फेसबुक पोस्ट ताबडतोब डिलीट करावी लागली.
देणगी मागून युनूस अडकले
मोहम्मद युनूस यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नागरिकांना "मुख्य सल्लागार मदत आणि कल्याण निधी" मध्ये देणगी देण्याचे आवाहन केले होते. बांग्लादेशी वृत्तपत्र द डेली स्टारमधील एका वृत्तानसार, ही पोस्ट २२ जुलै २०२५ रोजी दुपारी २:०० नंतर टाकण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट मोहम्मद युनूस यांचे वरिष्ठ सहाय्यक प्रेस सचिव फयज अहमद यांनी प्रेस विंगच्या अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देखील शेअर केली होती.
पोस्ट हटवली
मोहम्मद युनूस यांनी ही फेसबुक पोस्ट पोस्ट करताच नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. अनेक राजकीय पक्षांसह सामान्य लोकांनी युनूसवर हल्लाबोल केला. या फेसबुक पोस्टवर इतका गोंधळ उडाला की शेवटी कोणतेही कारण न देता ती हटवण्यात आली. अमिन सोनी नावाच्या व्यक्तीने म्हटले की, युनूस यांना आता देश चालवण्यासाठी भीक मागावी लागत आहे. तर, आणखी एका युजरने म्हटले, अशा पोस्टचा अर्थ काय? सरकारकडे पीडितांना मदत करण्यासाठी पुरेसे पैसे नाही का? हा जनतेचा अपमान आहे.
Where is the account of the 1,200 crore taka fund from last year’s flood?
— Himalaya 🇧🇩 (@Himalaya1971) July 22, 2025
Are you back to your schemes again, @ChiefAdviserGoB ?
This is a country, not an NGO.#MilestoneTragedy#BangladeshPlaneCrash#YunusMustGohttps://t.co/YTi4RVnczbpic.twitter.com/wzZ2p8wI0G
घटनास्थळी प्रचंड निदर्शने
मंगळवारी बांग्लादेशच्या राजधानीत विमान अपघातस्थळी आणि सचिवालय इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी अंतरिम सरकारचे शिक्षण सल्लागार आणि शिक्षण सचिव यांचा तात्काळ राजीनामा मागितला. ढाका ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार, घटनास्थळी पोहोचलेल्या सरकारच्या कायदा आणि शिक्षण सल्लागारांना आणि युनूसच्या प्रेस सचिवांना विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.