त्या 'एकमेव' साहेबांचा व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 07:53 PM2018-01-22T19:53:34+5:302018-01-22T20:15:02+5:30

उभ्या महाराष्ट्राला पोरकं करुन गेलेल्या बाळासाहेब ठाकरे नामक वाघाची ही जयंती आणि त्यानिमित्त त्यांचा जीवनप्रवास.

Balasaheb Thackeray's life journey from cartoonist to Hindu Hriday Samrat | त्या 'एकमेव' साहेबांचा व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास

त्या 'एकमेव' साहेबांचा व्यंगचित्रकार ते हिंदुह्रदयसम्राट होण्यापर्यंतचा प्रवास

Next
ठळक मुद्दे कोणत्याही मराठी माणसाला साहेब म्हणजे कोण ते वेगळं नव्याने सांगायची मुळीच गरज नाही.एक कणखर आणि निडर नेतृत्व अशी त्यांनी बनवलेली त्यांची ओळख त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कायम ठेवलीराज ठाकरेंचं सेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणं बाळासाहेबांसाठी वेदनादायक होतं

मुंबई : कोणत्याही मराठी माणसाला साहेब म्हणजे कोण ते वेगळं नव्याने सांगायची मुळीच गरज नाही. मराठी अस्मिता जागी करणारा आणि पर्यायाने झोपलेल्या किंवा झोपेचं सोंग घेतलेल्या मराठी माणसाला, हिंदु माणसाला आपल्या कणखर आवाजाने जागं करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा आज जयंतीदिन. मुंबईच्या आणि नंतर ओघानेच महाराष्ट्राच्या राजकारणात ‘मराठी माणूस’ अर्थात भूमिपुत्राच्या मुद्द्यावर अनेकांच्या ह्रदयात जागा मिळवणाऱ्या या एकमेव साहेबांची आज ९१वी जयंती.

एक कणखर आणि निडर नेतृत्व अशी त्यांनी बनवलेली त्यांची ओळख त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कायम ठेवली. स्थानिकांच्या प्रश्नांना हात घातल्याने आणि त्यांचा कैवार घेतल्याने मुंबईकरांचा विश्वास मिळवण्यास बाळासाहेबांना जास्त उशीर नाही लागला. त्यांच्या एका शब्दावर पुर्ण मुंबई थांबायची आणि पुर्ण मुंबई पुन्हा चालुही व्हायची. ही अशी ताकद असलेला नेता ना आजवर मुंबईला आणि मुंबईकरांना मिळाला ना कधी मिळेल, अशी चिन्हं आहेत. इतर राज्यांतुन महाराष्ट्रांत येणाऱ्या परप्रांतियांच्या लोढ्यांवर त्यांचा कायम रोष असे. त्यांच्यामुळे स्थानिकांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळत नसल्याची साहेबांची कायम असलेली तक्रार अनेकदा इतरांच्या विरोधाचं कारण व्हायची. त्यांच्या अनेक जहाल आणि कणखर वक्तव्यांवर राजकीय तुफानी माजत असे. मात्र त्यांना उघड विरोध करायची हिंमत ना कोणी दाखवली ना कुणामध्ये होती.  

त्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ला पुण्यात झाला होता. त्यांनी करिअरच्या सुरुवातीला द फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकाराची नोकरी केली. ते त्यावेळी बॉम्बे प्रेसिडेंसीचे सभासदही होते. तसंच दर रविवारी त्यांची व्यंगचित्रं टाईम्स ऑफ इंडीयामधून प्रकाशित होत असत. नंतर १९६०मध्ये त्यांनी फ्री प्रेसच्या नोकरीचा राजीनामा देऊन मार्मिक नामक स्वत:चं साप्ताहीक नियतकालिक सुरु केलं.

त्यांनी आपल्या तरुणपणात मुंबई आणि महाराष्ट्रात वाढत चाललेल्या गुजराथी, मारवाडी आणि दक्षिण भारतीय लोकसंख्येच्या मुद्द्यावर जोरदार टीका केली. या मुद्द्यावर मराठी माणसाचा पाठिंबा मिळवायला त्यांना ‘मार्मिक’ची मदत लाभली. १९ जून १९६६ला त्यांनी मराठी माणूस, भूमिपुत्र आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवर 'शिवसेना' या राजकीय पक्षाची सुरुवात केली. नंतर १९८९ ला ‘सामना’ हे मराठी तर ‘दोपहर का सामना’ हे हिंदी वृत्तपत्र सुरु केलं. त्यावेळी शिवसेना हा पक्ष व्हॅलेंटाईन डेसारख्या काही पाश्चिमात्य ‘संस्कृतींना’ कायम विरोध करत राहिला. त्यांनीच लोकांची ‘बॉम्बे’ बोलायची सवय मोडीत काढत मुंबईला तिचं मुळ नाव मिळवून दिलं.

त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला कायम मराठी माणसांच्या दुखऱ्या नस ओळखून ते मुद्दे वर उचललें. हे मुद्दे मुंबईतल्या सर्व तरुणांशी सरळ संबंधित होते. स्थानिकांना मुंबईतच नोकरी उपबल्ध करुन देण्याचा मुद्दाही त्यापैकीच एक. या गोष्टीने तर सामान्य मराठी मध्यमवर्गीय मुंबईकरांचा ठाकरे आणि शिवसेनाप्रति विश्वास वाढला. त्यांनी आपल्या भाषणांतून आणि व्यंगचित्र आणि सामनामधून आपले मुद्दे कायम लोकांसमोर मांडले. ते कधी कधी काहीसे जहाल आणि ज्वलंत व हिंसक वाटले तरी स्थानिकांना ते पटले. बाळासाहेब आपला मुद्दा आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यात कायम यशस्वी ठरले. शेवटी १९९५ साली त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत पहिली महाराष्ट्र विधानसभा निवडणुक लढवली आणि त्यात विजयही मिळवला. स्वत: पदावर न येता त्यांच्या एका इशाऱ्यावर कामं होत असतं. ते अक्षरश: मुंबईत बसून दिल्लीवर राज्य करीत असतं. याचमुळे त्यांना रिमोट कंट्रोलरही म्हटलं जाई. पाहा व्हिडीओ - 

राजकीय कारकिर्दीसोबतच त्यांचं वैयक्तिक तसंच कौटूंबिक आयुष्य कायम चढ-उतारांनी भरलेलं होतं. सर्वच क्षेत्रात त्यांनी काही गोष्टी गमावल्या तर बऱ्याच गोष्टी कमावल्या. १९९६ मध्ये त्यांच्या पत्नीच्या आणि मोठ्या मुलाच्या झालेल्या निधनाने त्यांना फार मोठा धक्का बसला. नंतर काही कारणास्तव निवडणूक आयोगाने त्यांना १९९९मध्ये पुढची सहा वर्ष मतदानाचा आणि निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार काढून घेतला. मग त्यांनी २००६मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला. 

२०१२ला जवळपास जुलैपासून त्यांच्या आजारपणाच्या बातम्या येत होत्या. त्यावर्षी दसरा मेळाव्याला पहिल्यांदा बाळासाहेब गैरहजर होते आणि समस्त शिवसैनिकांना त्यांची उणीव सतत भासत राहिली. या कार्यक्रमात एका व्हिडीयोद्वारे त्यांनी सैनिकांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, ‘तुम्ही आतापर्यंत मला सांभाळलंत आता माझ्या उध्दव आणि आदित्यला सांभाळा. त्यांना तुमच्यावर लादलं गेलं नाहीये. कारण ही काँग्रेस नाहीये. सेनेप्रति आपली प्रामाणिकता तशीच राहु द्या. मला आता चालता येत नाही. बोलतानाही दम लागतो. मी आता तुमच्यासोबत नसलो तरी माझं मन मी कुणाला दिलं नाही. मी तुमच्या ह्रदयात आहे.’

तसंच राज ठाकरेंचं सेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणं बाळासाहेबांसाठी वेदनादायक होतं. मनसेनेही थोड्या कालावधीत आपल्या पक्षाची ओळख निर्माण करत महाराष्ट्रात सेनेपेक्षा जास्त जागा जिंकवून आणल्या. तरीही शेवटपर्यंत बाळासाहेब राज ठाकरेंच्या वेगळं होण्याबाबत दुखावले गेले होते. दोघांचे राजकीय मार्ग भिन्न झाले असले तरीही कुटूंब म्हणून ते कायम एकत्र होते. बाळासाहेबांच्या प्रत्येक आजारपणात राजनीं त्यांची भेट घेऊन विचारपुस केली. ते कायम त्यांच्यासाठी वडीलांच्या स्थानी होते.   

असा हा ढाण्या वाघ जेव्हा सर्वांना पोरकं करुन निघून गेला तेव्हा त्यांच्या कोणत्याच इशाऱ्याशिवाय मुंबई थांबली. त्यांच्या अंत्यदर्शनापासून ते अंत्यविधीपर्यंत मुंबईचा वेग मंदावला. १७ नोव्हेबर २०१२ला दिर्घ आजारपणात या वाघाचं निधन झालं आणि मुंबईचा श्वास रोखला गेला. बाळासाहेब ठाकरेंसारखा मुंबईला न भूतो न भविष्यति मिळालेला हा नेता आज मातोश्रीवर असता तर ९१ वर्षाचा झाला असता.

 

Web Title: Balasaheb Thackeray's life journey from cartoonist to Hindu Hriday Samrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.