दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:29 IST2025-06-04T17:28:00+5:302025-06-04T17:29:26+5:30
या गाडीतून आलेल्या सैनिकांनी घराचे कुलूप तोडले. घराचे गेट उखडून ते लष्कराच्या गाडीत ठेवले. घरातील साहित्याची नासधूस केली. हिमांशीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही मारहाण करत, जर या घरात राहाल, तर सर्वांना गोळ्या घालण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली.

दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
बागपतमध्ये दोन भावांमधील घराच्या वाटणीवरून झालेल्या वादात भारतीय लष्कराच्या जवानांची एन्ट्री झाली. सैन्यातदलात कर्नल पदावर कार्यरत असलेल्या एका भावाने आपल्या दुसऱ्या भावाकडून आणि काकांकडून घराचा ताबा घेण्यासाठी लष्कराची एक तुकडीच आणली. अर्धा डझन जवान चित्रपटातील एखाद्या सीन प्रमाणे गावात आले आणि त्यांनी घराचे गेट आणि कुलूप तोडून घराचा ताबा घेतला. एवढेच नाही तर, सैनिकांनी हातोड्याच्या साहाय्याने घराचे लोखंडी गेट तोडले आणि ते त्यांच्या ट्रकमध्ये टाकून घेऊन गेले. सैनिकांनी घराचे कुलूप आणि गेट तोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर, बडोत कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार जम्मू आणि काश्मीरमधील सिग्नल रेजिमेंटमध्ये तैनात आहेत. ते मेरठच्या लष्करी वाहनात सैनिकांना घेऊन आले. वाजिदपूर गावातील रहिवासी धीर सिंह तोमर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते २०१२ मध्ये सरूरपूर खेडकी या गावातील इंटर कॉलेजमधून प्राचार्य पदावरून निवृत्त झाले आहेत. ते सध्या त्यांची पत्नी सुशीला आणि अल्पवयीन नात हिमांशीसह गावात राहतात. हिमांशी ११ व्या वर्गात शिकते.
ले. कर्नल तरुण कुमारने लष्कराच्या वाहनातून आणले होते सैनिक -
धीर सिंह तोमर यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर डिसेंबर 2024 मध्ये घर बांधायला सुरुवात केली. त्यांनी हे घर नात हिमांशीला भेट दिले होते. हिमांशीच्या वडिलांचे २०११ मध्ये निधन झाले आहे. धीर सिंह म्हणाले, घर तयार झाल्यानंतर, आपला धाकटा भाऊ ऋषिपाल आणि त्यांचा मुलगा लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार यांनी १७ मे २०२५ रोजी घराचे कुलूप तोडले. १९ मे रोजी दुपारी २ वाजता ऋषिपाल, त्यांची पत्नी आणि मुलगा लेफ्टनंट कर्नल तरुण कुमार काही सैनिकांना लष्कराच्या गाडीत घेऊन आले.
सैनिकांनी हातोड्याने तोडले घराचे गेट -
गाडीच्या नंबर प्लेटवर पांढऱ्या रंगाचा कागद चिकटवण्यात आला होता. या गाडीतून आलेल्या सैनिकांनी घराचे कुलूप तोडले. घराचे गेट उखडून ते लष्कराच्या गाडीत ठेवले. घरातील साहित्याची नासधूस केली. हिमांशीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला, पण तिलाही मारहाण करत, जर या घरात राहाल, तर सर्वांना गोळ्या घालण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली.