"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:04 IST2025-12-25T16:02:57+5:302025-12-25T16:04:06+5:30
Dheerendra Shastri Bangladesh Hindu: बांगलादेशात सातत्याने हिंदू लोकांवर हल्ले होत आहेत.

"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
Dheerendra Shastri Bangladesh Hindu: गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यानंतर, बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायांविरुद्धच्या असंख्य घटनांमुळे तेथील हिंदू लोकांवर हल्ले करण्यात आले. १८ डिसेंबरला ईशनिंदेच्या आरोपाखाली मैमनसिंगमधील बालुका येथे जमावाने कपड्याच्या कारखान्यातील कामगार दिपू चंद्र दास (२५) याला मारहाण करून ठार केले आणि त्याचा मृतदेह जाळून टाकला. एका वृत्तसंस्थेनुसार, दास याला प्रथम कारखान्याबाहेर जमावाने मारहाण केली आणि नंतर झाडाला लटकवले. जमावाने त्याचा मृतदेह ढाका-मैमनसिंग महामार्गाजवळ सोडला आणि नंतर तो जाळून टाकला. बांगलादेशातीलहिंदूविरोधी परिस्थिती पाहता बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांनी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे विधान केले आहे.
हिंदूंनो, वेळीच एकत्र या...
धीरेंद्र शास्त्री यांनी शेजारच्या बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेता, भारतातील हिंदूंना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. छत्तीसगडमधील भिलाई येथे माध्यमांशी बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले, "जर तुम्हाला भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती पहायची नसेल, तर आताच हिंदूंनी एकत्र येण्याची योग्य वेळ आहे. जर हिंदू एकत्र आले नाहीत तर बांगलादेशात जे घडतंय ते भारतातील प्रत्येक रस्त्यावर घडताना दिसेल."
'धर्मांतर हे कर्करोगापेक्षाही धोकादायक आहे'
छत्तीसगडमधील अलिकडच्या सांप्रदायिक तणावाचा संदर्भ देत ते म्हणाले की तिथे जे घडले ते चांगले नव्हते, परंतु हिंदूंनी दाखवलेल्या एकतेबद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल. धीरेंद्र शास्त्री यांनी धार्मिक धर्मांतरावर अतिशय कडक भूमिका घेतली. ते म्हणाले, "धर्मांतर आणि धर्मावर आधारित हिंसाचार हे भारतात कर्करोगापेक्षाही धोकादायक आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि संस्कृतीसाठी हा सर्वात मोठा धोका आहे."