'बाबासाहेब, मला ताकद द्या...', AAP ने शेअर केला अरविंद केजरीवालांचा Ai व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:03 IST2024-12-19T18:02:39+5:302024-12-19T18:03:08+5:30
अमित शाहांच्या वक्तव्यानंतर देशातील राजकारण तापले आहे.

'बाबासाहेब, मला ताकद द्या...', AAP ने शेअर केला अरविंद केजरीवालांचा Ai व्हिडिओ
Arvind Kejriwal : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे संसदेपासून ते रस्त्यापर्यंत...राजकारण तापले आहे. गृहमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून, त्यांनी अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर AI व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि बाबासाहेब आंडेकर दिसत आहेत.
या Ai व्हिडिओमध्ये बाबासाहेब आंबेडकर, अरविंद केजरीवालांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. यासोबत केजरीवालांचा आवाज ऐकू येतो. ते म्हणतात, 'बाबासाहेब मला ताकद द्या, जेणेकरून तुमचा आणि तुमच्या संविधानाचा अपमान करणाऱ्यांशी मी लढू शकेन.'
जय भीम🙏 pic.twitter.com/7LerAkbhwO
— AAP (@AamAadmiParty) December 19, 2024
या AI व्हिडिओसोबतच आम आदमी पार्टीने बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल इतरही अनेक पोस्ट केल्या आहेत. दुसऱ्या पोस्टमध्ये पक्षाने लिहिले की, बाबासाहेब फक्त एक नेते नाहीत, ते या देशाचे आत्मा आहेत. आणखी एका पोस्टमध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात, बाबासाहेब आमचे देव आहेत, अमित शाहांनी आमच्या देवाचा अपमान केला आहे.
बाबासाहेबांना मी माझे आराध्य दैवत मानतो
केजरीवाल म्हणाले, अमित शाहजी, तुम्ही आमच्या देवाचा अपमान करण्याची हिम्मत कशी केली? बाबासाहेबांना मी माझे आराध्य दैवत मानतो आणि त्यांचा अपमान करणाऱ्या भाजपला प्रत्येक स्तरावर विरोध करेन. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह म्हणतात की, भाजप आणि आरएसएसने नेहमीच बाबासाहेब आंबेडकर आणि देशाच्या संविधानाचा द्वेष केला आहे. दलित आणि मागासवर्गीयांना दिलेल्या अधिकारांना त्यांचा विरोध आहे. अमित शहा यांनी सभागृहात बाबासाहेबांचा अपमान केला असून दिल्लीतील जनता या अपमानाचा बदला घेईल.
"बाबा साहब अंबेडकर देश की आत्मा हैं।"@ArvindKejriwalpic.twitter.com/jUlar8GNS5
— AAP (@AamAadmiParty) December 19, 2024
आम आदमी पार्टीचे नेते संदीप पाठक म्हणाले की, बाबासाहेबांचा अपमान देशातील कोणीही सहन करणार नाही. या देशात प्रत्येक व्यक्ती आणि समाजाला संविधानातून समानता आणि अधिकार मिळाले आहेत. गृहमंत्री आणि भाजपने आपली चूक मान्य करून माफी मागावी आणि अमित शहाांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.