बाबा रामदेव यांनी आमीर खानलाच वादात ओढले, IMA ला दिलं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 10:08 IST2021-05-30T10:08:04+5:302021-05-30T10:08:39+5:30
बाबा रामदेव यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव यांनी दिले आहे.

बाबा रामदेव यांनी आमीर खानलाच वादात ओढले, IMA ला दिलं चॅलेंज
मुंबई - योगगुरू रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी अॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर चांगलाच वाद उफाळून आला आहे. बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीनंतर पुन्हा एकदा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या वादामध्ये कुणी बाबांच्या समर्थनार्थ तर कुणी विरोधात उडी घेत आहेत. साध्वी प्राची (Sadhvi Prachi) यांनी रामदेव यांच्या समर्थनार्थ उडी घेतली आहे. तर, बाबा रामदेव यांनी अभिनेता आमीर खानलाही या वादात ओढून घेतलं आहे. त्यामुळे, हा वाद आणखीनच चर्चेचा विषय बनला आहे.
बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय जायसवाल यांनी अॅलोपॅथीसंदर्भात वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून संजय यांनी बाबा रामदेव यांना "ते योगी नाहीत योगाचे कोका कोला आहेत" असं म्हटलं आहे. पश्चिम चंपारणमधून अनेकदा खासदार राहिलेल्या जायसवाल यांनी अॅलोपॅथीच्या मुद्द्यावरुन आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यात सुरू असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहिली आहे. आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यातील हा शाब्दीक वाद वाढत असून आता रामदेव यांनी आमीर खानलाही या वादात ओढले आहे.
बाबा रामदेव यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव यांनी दिले आहे. या व्हिडिओमध्ये आमीरने देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत चर्चा केली आहे. त्यामध्ये, वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप या व्हिडिओत केला आहे.
देशातील बड्या औषध कंपन्या आणि मेडिकल माफिया एलोपॅथी औषधांच्या माध्यमातून 2 लाख कोटी रुपयांची उलाढाल करुन मोठा नफा कमावतात. या क्षेत्राशी निगडीत लोक स्वार्थापोटी मोठा नफा कमावून औषधांची चढ्या दराने विक्री करतात, असा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे. तसेच, देशातील नागरिकांना आयुर्वेदांच्या माध्यमातून स्वस्त आणि सुलभ उपचार देऊ इच्छित असल्याचही रामदेव यांनी म्हटलं आहे.
साध्वी प्राचीकडून बाबा रामदेव यांचं समर्थन
"आयएमएच्या माध्यमातून 1928 मध्ये एक एनजीओ तयार केली होती. भारतात मदर तेरेसा नावाची एक जादूगार होती, जी लोकांना स्पर्श करूनच बरं करायची. त्यांचा मृत्यूही रुग्णालयात झाला होता" असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे. तसेच "बाबा रामदेव यांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे. आयएमएच्या लोकांनो लक्ष देऊन ऐका, वाटीभर पाण्यात बुडून मरा. लाज वाटू द्या. आयुर्वेदावर चिखलफेक करणाऱ्यांनो नीट ऐका, बाबा रामदेव देशासाठी खूप मोठं कार्य करत आहेत. ते कोट्यवधी लोकांना बरं करत आहेत" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
खासदार महुआ मोईत्रा यांची संतप्त प्रतिक्रिया
बाबा रामदेव यांना अटक करण्याची मागणी झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, किसी का बाप भी अरेस्ट नही कर सकता, असे बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. "स्वामी रामदेव यांना कुणाचा बापही अटक करू शकत नाही. रामकृष्ण यादव, आपण खरं बोललात. तुमचा भाऊ आणि बाप तर विरोधकांना अटक करण्यात गुंतले आहेत" असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी रामदेव बाबांवर टीकास्त्र सोडलं आहे.