आझम खानना मोठा धक्का, मुलगा अब्दुल्लाची आमदारकी न्यायालयानं केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 13:18 IST2019-12-16T13:17:57+5:302019-12-16T13:18:11+5:30
समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे.

आझम खानना मोठा धक्का, मुलगा अब्दुल्लाची आमदारकी न्यायालयानं केली रद्द
नवी दिल्लीः समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांना अलाहाबाद उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिला आहे. न्यायालयानं आझम खान यांचा मुलगा अब्दुल्लाची आमदारकी रद्द ठरवली आहे. निवडणुकीत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात अब्दुल्ला आझमचं वय निवडणूक लढण्यासाठी पूर्ण नव्हतं, त्यासाठी त्यानं बनावट दस्तावेजाचा वापर केल्याचं उघड झालं आहे.
अब्दुल्लाच्या विरोधात बसपा उमेदवार नवाब काजीम यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत आरोप करण्यात आला होता की, निवडणूक लढताना अब्दुल्ला 25 वर्षांचा नव्हता. अब्दुल्लावर बनावट कागदपत्राद्वारे निवडणूक लढण्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात अलाहाबाद न्यायालयानं 27 सप्टेंबरपर्यंत निवडणूक निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर न्यायमूर्ती एसपी केसरवानी यांच्या पीठानं या प्रकरणावर निर्णय दिला आहे. अब्दुल्ला आझम हा समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांचा छोटा मुलगा आहे. 2017मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशची निवडणूक अब्दुल्ला लढला होता. अब्दुल्लाने रामपूर क्षेत्रात स्वार विधानसभा जागेवरून निवडणूक जिंकली होती. 2017च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाची हवा होती. अशा वातावरणातही रामपूरमधून आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला यांनी दोन्ही जागांवर विजय मिळवला होता. अब्दुला आझमनं भाजपाचे उमेदवार लक्ष्मी सैनी यांना 50 हजारांहून अधिकच्या मतांनी पराभूत केलं होतं. तर भाजपाचे उमेदवार नवाब काजीम तिसऱ्या स्थानी होते.
जानेवारीमध्ये भाजपा नेते आकाश सक्सेनांच्या तक्रारीनंतर आझम खान यांच्या पूर्ण कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सक्सेना यांनी तक्रारीत अब्दुल्लानं बनावट जन्मदाखला तयार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेत अब्दुल्ला खान यांची आमदारकी रद्द केली आहे.