अयोध्येत आणखी एका प्राणप्रतिष्ठेची तयारी, रामललानंतर आता 'राजा रामा'चा राज्याभिषेक सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:03 IST2025-04-08T15:03:06+5:302025-04-08T15:03:41+5:30
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भव्य श्रीराम मंदिरात भगवान रामाचा दरबार तयार झाला आहे.

अयोध्येत आणखी एका प्राणप्रतिष्ठेची तयारी, रामललानंतर आता 'राजा रामा'चा राज्याभिषेक सोहळा
Ayodhya Ram Mandir : गेल्यावर्षी अयोध्येत भगवान राम मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिरात विराजमान असलेल्या बालरुपातील 'रामलला'ची प्राणप्रतिष्ठा झाली. आता जवळजवळ सव्वा वर्षानंतर भव्य राम मंदिरात आणखी एका अभिषेक सोहळा होणार आहे. राम मंदिरातच भगवान श्रीरामाचा भव्य दरबारही बांधण्यात आला आहे. हा दरबार मंदिराच्या पहिल्या मजल्यावर बांधला असून, लवकरच याचे लोकार्पण होईल.
द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, हा अभिषेक सोहळा भव्य करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अलिकडेच श्रीराम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत समारंभाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना अभिषेक समारंभाची तारीख जाहीर करण्याची जबाबदारी देण्यात आली. हा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यासारखा नसून, त्याचे स्वरुप बरेच विस्तृत असेल, असे सांगितले जात आहे.
गेल्यावर्षी रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला, आता राजा रामाचा अभिषेक सोहळा होईल. हा समारंभ मंदिर बांधकामाच्या पूर्णतेचा एक भाग असेल. मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष सध्या पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा आहेत. मिश्रांनी अलीकडेच सांगितले होते की, मंदिर संकुलाचे बांधकाम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल, तर परकोटाच्या कंपाऊंड भिंतीचे उर्वरित काम या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल.
राम दरबार कसा असेल?
कर्नाटकातील कलाकार अरुण योगीराज यांनी रामललाची 51 इंच उंच मूर्ती तयार केली होती, तर जयपूरमध्ये शिल्पकार प्रशांत पांडे यांच्या नेतृत्वाखाली 20 कारागिरांच्या पथकाद्वारे पांढऱ्या मकराना संगमरवरापासून राम दरबार बनवला जात आहे. रामायणाची सर्वात लोकप्रिय आवृत्ती असलेल्या रामचरितमानसचे लेखक संत तुलसीदास यांची एक मोठी मूर्तीदेखील या संकुलात स्थापित केली जात आहे.