९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:03 IST2023-11-29T15:58:50+5:302023-11-29T16:03:16+5:30
Ayodhya Ram Mandir: ६ महिने परिश्रमाने साकारण्यात आलेल्या ११ रथांतून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले आहे.

९ वर्षांचा संकल्प फळला! रामलल्लाचा अभिषेक, महाआरतीला पाठवले ६०० किलो तूप, १०८ कलश
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा राम मंदिरात केली जाणार आहे. जसजसे दिवस पुढे जात आहेत, तसे यासंदर्भातील तयारीला वेग आला आहे. या सोहळ्यासाठी हजारो भाविक अयोध्येत येणार आहेत. राम मंदिर आणि रामलल्ला प्राणप्रतिष्ठा यांमध्ये आपलाही काही खारीचा वाटा असावा, असे अनेकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर आता अभिषेक आणि महाआरतीसाठी जोधपूरहून ६०० किलो तूप पाठवले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारंपरिक पद्धतीने बैलगाडी सजवून याचे १०८ कलश अयोध्येकडे रवाना करण्यात आले आहेत. १०८ कलशांमध्ये हे ६०० किलो तूप पाठवण्यात आले आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या बैलगाड्यांना रथाचे स्वरुप देण्यात आले आहे. हे कलश रवाना करण्यापूर्वी पूजन, आरती करण्यात आली. जोधपूरमधील श्री श्री महर्षी संदीपनी रामधर्म गोशालाचे संचालक महर्षी संदीपनी महाराज यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
११ रथांमधून ६०० किलो तूप अयोध्येला पाठवण्यात आले
रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शेकडो रामभक्त अयोध्येला रवाना झाले आहेत. ११ रथांमध्ये १०८ कलशांसह १०८ शिवलिंग ठेवण्यात आले आहेत. यासह गणपती बाप्पा, रामभक्त हनुमान यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर भारतात वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत देव दिवाळी साजरी केली जाते. या देव दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर हे ११ रथ अयोध्येकडे रवाना करण्यात आले.
दरम्यान, जानेवारी २०२४ मध्ये राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. आमच्या येथे असलेल्या गोठ्यांमधून तयार केलेले तूप रामलल्लाच्या आरती आणि हवनात वापरले जाईल. जोधपूरहून तूप पाठवले गेले ही भाग्याची गोष्ट आहे. गोशाळेतून ११ विशेष रथ रवाना करण्यात आले. ६ महिन्यांपासून रथ साकारण्याची तयारी सुरू होती. या प्रत्येक रथाची किंमत ३.५ लाख रुपये आहे. ९ वर्षांपूर्वी याचा संकल्प केला गेला होता. अयोध्येत जेव्हाही राम मंदिर बांधले जाईल, तेव्हा या ठिकाणाहून शुद्ध देशी तूप पाठवले जाईल. राम मंदिरात त्याच तुपाने मंदिराची अखंड ज्योत प्रज्वलित होणार आहे, असे महर्षी संदीपनी महाराज यांनी सांगितले.