जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 06:59 AM2024-05-23T06:59:11+5:302024-05-23T06:59:58+5:30

निवडणुकीमुळे देशाची सामाजिक-सांस्कृतिक  वीण उसवता कामा  नये, असेही आयोगाने म्हटले आहे...

Avoid campaigning in elections on caste-religion basis; Commission advised BJP, Congress | जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला

जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बुधवारी जात, समुदाय, भाषा आणि धार्मिक निकषांवर प्रचार करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला भाजप आणि काँग्रेसला दिला. निवडणुकीमुळे देशाची सामाजिक-सांस्कृतिक  वीण उसवता कामा  नये, असेही आयोगाने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या भाषणावरून भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस बजावल्यानंतर  महिनाभरानंतर निवडणूक निरीक्षकांनी त्यांचा बचाव नाकारला. भाजपच्या पक्षाच्या स्टार प्रचारकांना धार्मिक आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर राहण्यास सांगितले. समाजात फूट पाडणारी प्रचाराची भाषणे थांबवावीत, असेही आयोगाने भाजपला सांगितले. नड्डा यांच्यासह निवडणूक आयोगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही अशीच नोटीस बजावून त्यांना विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने केलेल्या तक्रारींना उत्तर देण्यास सांगितले होते.

निवडणूक आयोगाने खरगे यांचाही बचाव नाकारला. संरक्षण दलांचे राजकारण करू नये, तसेच सशस्त्र दलांच्या सामाजिक - आर्थिक रचनेबाबत संभाव्य फूट पाडणारी विधाने करू नयेत, असे सांगितले. त्यांचे स्टार प्रचारक आणि उमेदवार राज्यघटना रद्द किंवा बदलली जाऊ शकते, असा चुकीचा आभास देणारी विधाने करणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देशही आयोगाने खरगे यांना दिले. 

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा
- देशातील निवडणुकीची परंपरा आणि लोकशाहीच्या मूल्यांना कोणत्याही परिस्थितीत धक्का लागता कामा नये. राजकीय पक्षांवर वर्तमानातच नव्हे, तर भविष्यातील नेते घडविण्याची जबाबदारी आहे.
- पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना प्रचारावेळी शिस्त व नियमावलींबाबत मार्गदर्शन करावे, असा सल्ला आयोगाने दिला आहे.
 

Web Title: Avoid campaigning in elections on caste-religion basis; Commission advised BJP, Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.