ते ऑस्ट्रेलियातून पत्नीसह भारतात फिरायला आले. भारत भ्रमण करत असतानाच त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या व्यक्तीचं नाव आहे डोनाल्ड सॅम्स! महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मृत्यूपत्रामध्येच भारतात अंत्यसंस्कार करण्याची अंतिम इच्छा लिहिलेली होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१२व्या वेळा भारत दौऱ्यावर आलेल्या डोनाल्ड सॅम्स यांचे निधन झाले. १० फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियातून एका ग्रुपसोबत ते भारतात फिरायला आले होते. कोलकातावरून ते पाटणाला आले. गंगा नदीच्या पात्रातून त्यांनी हा प्रवास केला.
बबुआ घाटावर बिघडली प्रकृती
२१ फेब्रुवारी रोजी रात्री डोनाल्ड सॅम्स हे मुंगेरमधील बबुआ घाटावर आले. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. मुंगेर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले.
उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले. प्रशासनाने त्यांच्या मृत्यूची माहिती भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना दिली. ऑस्ट्रेलियातील दूतावासाशी संपर्क करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या दूतावासाने परवानगी दिल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचीही परवानगी घेण्यात आली. सर्वांची सहमती मिळाल्यानंतर डोनाल्ड यांच्यावर मुंगेर येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. खिश्चिन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
एका पादरीला बोलवून चुरंबा येथील ख्रिश्चन दफनभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी एलिस होती. डोनाल्ड यांच्यावर शवविच्छेदन न करता अंत्यसंस्कार करण्याची इच्छा एलिस यांनी व्यक्त केली होती.
मुंगेरचे जिल्हाधिकारी अवनीश कुमार सिंह यांनी सांगितले की, "पार्थिवासह क्रूज जहाज २१ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून २२ फेब्रुवारी दुपारपर्यंत बबुआ घाटावर उभे होते. एलिस यांच्या इच्छेनुसार शवविच्छेदन करण्यात आले नाही."
भारतात अंत्यसंस्कार करण्याची का होती इच्छा?
एलिस सॅम्स यांनी सांगितले की डोनाल्ड सॅम्स यांचे वडील ब्रिटिश शासन असताना आसामध्ये ब्रिटिश लष्करात अधिकारी होते. त्यामुळेच त्यांनी मृत्यूपत्रात स्वतःवर भारतात अंत्यसंस्कार करण्याची इच्छा नमूद केलेली होती. योगायोगाने भारत भेटीवर असतानाच त्यांचे निधन झाले. भारताबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. ते ज्या ज्या वेळी भारतात यायचे, तेव्हा कोलकातावरून पाटणाचा प्रवास करायचे आणि आसामलाही भेट द्यायचे.