शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 05:35 IST2025-07-27T05:35:51+5:302025-07-27T05:35:51+5:30
शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने दिला आहे.

शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच्या उपाययोजना आणि सुविधांचे लेखापरीक्षण (सुरक्षा ऑडिट) करणे अनिवार्य आहे, असा आदेश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना शनिवारी दिला आहे. राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील सरकारी शाळेचा भाग कोसळून सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा आदेश जारी करण्यात आला.
शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, असा आदेश राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने दिला आहे. शाळांमधील आणि विद्यार्थ्यांशी संबंधित सुविधा व यंत्रणांचे सुरक्षा ऑडिट करावे, आपत्कालीन काळात कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. शाळेच्या इमारतींची स्थिती, अग्निसुरक्षा व वीज जाळ्यांची स्थिती यांची तपासणी होणे आवश्यक आहे.
‘विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्यही जपा’
शिक्षण खात्याने म्हटले की, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्याकरिता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अग्निशमन दल, पोलिस, वैद्यकीय संस्था यांच्या सहकार्याने नियमित प्रशिक्षण शिबिरे व मॉक ड्रील आयोजित करावी. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यावरही भर द्यायला हवा.