Rahul Gandhi on ECI: काँग्रेस नेते राहुल गांधी मतदार यादीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी एअर चीफ मार्शल एपी सिंह यांच्या 'ऑपरेशन सिंदूर' वरील विधानावरुन भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मत चोरीच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे भाजपचे षड्यंत्र आहे, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उदित राज यांनी आयएएनएसशी बोलताना हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांच्या त्या विधानावर प्रतिक्रिया दिली, ज्यात त्यांनी म्हटले की, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताने पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली. उदित राज म्हणाले, हे विधान राहुल गांधींच्या 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष वळविण्यासाठी केले आहे. उदित राज यांनी असा दावा केला की, जर आता समोर आलेली विधाने आधी आली असती, तर भारतीय सैन्याचे मनोबल, जनतेचा विश्वास आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका मजबूत झाली असती. भारताचे परराष्ट्र धोरण मजबूत झाले असते, कारण अनेक देश पाकिस्तानसोबत उभे होते आणि भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडत होता.
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
काँग्रेस नेत्याने असाही युक्तिवाद केला की, हवाई दल प्रमुखांनी संसदेत दिलेल्या विधानाची माहिती पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना द्यायला हवी होती, परंतु त्यांनी हे केले नाही. सध्या निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप आहे, त्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित विधाने येत आहेत. आम्ही सुरक्षा दलांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीत. आमचे सशस्त्र दल सर्वोत्तम आहेत. मात्र, मत चोरीचे प्रकरण समोर आल्याने त्यांना ऑपरेशन सिंदूरशी संबंधित विधान करण्यास सांगितले जात आहे. मत चोरीच्या मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधारी पक्ष काहीही करू शकतो. संपूर्ण देशाचे लक्ष सध्या मत चोरीच्या मुद्द्याकडे आहे, असा दावाही त्यांनी केला.