विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा जलवा, १३ पैकी ११ जागांवर आघाडी, भाजपाला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 13:14 IST2024-07-13T13:12:19+5:302024-07-13T13:14:11+5:30
Assembly by Election Result 2024: सात राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेससह (Congress) इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, १३ पैकी ११ ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपाला (BJP) केवळ १ जागा जिंकता आली आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा जलवा, १३ पैकी ११ जागांवर आघाडी, भाजपाला धक्का
सात राज्यांमधील विधानसभेच्या १३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेससहइंडिया आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार मुसंडी मारली असून, १३ पैकी ११ ठिकाणी इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपाला केवळ १ जागा जिंकता आली असून, सध्या एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
पश्चिम बंगालमधील ४, हिमाचल प्रदेशमधील ३, उत्तराखंडमधील दोन आणि मध्य प्रदेश, बिहार, पंजाब आणि तामिळनाडूमधील एक अशा मिळून १३ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये पश्चिम बंगालमधील चारही जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर उत्तराखंडमधील दोन्ही जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्याशिवाय हिमाचल प्रदेशमधील दोन जागांवर काँग्रेस तर एका जागेवर भाजपाच्या उमेदवाराने विजयी आघाडी घेतली आहे. तामिळनाडूतील एका जागेवर डीएमके, तर बिहारमधील एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे.
मतमोजणी सुरू असलेल्या १३ जागांपैकी काही मतदारसंघात चुरशीची लढत सुरू आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशमधील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रिनाथ आणि मंगलौर या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच पोटनिवडणूक झालेल्या १३ पैकी ४ जागांवर तृणमूल काँग्रेस, ५ जागांवर काँग्रेस, तर डीएमके, भाजपा, आप आणि अपक्ष हे प्रत्येकी एका जागेवार आघाडीवर आहेत.