"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 16:39 IST2025-12-12T16:37:14+5:302025-12-12T16:39:15+5:30
चर्चेदरम्यान सरमा यांनी राज्यात वेगाने बदलणाऱ्या लोकसंख्येवरही चिंता व्यक्त केली...

"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
राज्यातील मतदान हे केवळ सरकारी योजना अथवा आर्थिक मदतीवरच अवलंबून नाही. आसाममध्ये असे अनेक समुदाय आहेत, ज्यांची राजकीय पसंती पैसा अथवा सोयीसुविधांनी बदलत नाही. राज्यात मतदानाचा कल सरकारी योजना अथवा आर्थिक प्रोत्साहनांवर नाही, तर विचारधारेने प्रभावित असतो, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. ते एका खासगी टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात बोलत होते.
"१० हजार रुपये द्या अथवा १ लाख रुपये, कोणताही मुस्लीम...!"
यावेळी, आपण बिहारप्रमाणे महिलांना रोख मदत देण्याची योजना आणू शकतात का? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, "आसाममधील काही समुदाय त्यांच्या कामाची प्रशंसा करतात, पण मतदानाच्या वेळी त्यांच्या बाजूने येत नाहीत. राज्यात मतदानाचा कल सरकारी योजना अथवा आर्थिक प्रोत्साहनाने नव्हे, तर विचारधारेने प्रभावित असतो." एवढेच नाही तर, कितीही पैसा द्या, मग १० हजार रुपये द्या अथवा १ लाख रुपये, कोणताही मुस्लीम मतदार आपल्याला त्यांचा उमेदवार म्हणून निवडणार नाही," असेही सरमा यांनी म्हणाले.
सरमा पुढे म्हणाले, "कोणत्याही लोकशाहीमध्ये मतदार केवळ फायदा बघून मतदान करत नाहीत. योजना राबवणे ही सरकारची जबाबदारी आहे, पण लाभ घेणारा प्रत्येक नागरिक त्याच सरकारला मत देईल हे मानणे योग्य नाही. आसाममधील अनेक वर्ग त्यांची वैचारिक भूमिका, ओळख आणि राजकीय धारणा याआधारावर मतदान करतात.
वेगाने बदलणाऱ्या लोकसंख्येवरही व्यक्त केली चिंता -
चर्चेदरम्यान सरमा यांनी राज्यात वेगाने बदलणाऱ्या लोकसंख्येवरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध स्थलांतरामुळे लोकसंख्येचा समतोल बिघडत आहे. आसाममधील मुस्लीम लोकसंख्या २०२१ मध्ये सुमारे ३८% होती आणि १९६१ पासून दर दशकात ४-५% ची सातत्याने वाढ नोंदवली गेली आहे. २०२७ पर्यंत हे प्रमाण ४०% पर्यंत पोहोचू शकते. हे प्रमाण ५०% हून अधिक झाल्यास राज्याच्या इतर समुदायांची ओळख आणि सांसस्कृतिक वारसा धोक्यात येऊ शकतो, असेही मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे.
आपले अनेक मुस्लीम कुटुंबांशी चांगले संबंध आहेत. पण निवडणुकीच्या वेळी हे सलोख्याचे संबंध मतांमध्ये रूपांतरित होत नाहीत. मुस्लिम मते काँग्रेसकडे गेली तरी भाजप आसाममध्ये आपले राजकीय स्थान टिकवून ठेवण्यास सक्षम आहे, असा विश्वासही सरमा यांनी यावेळी व्यक्त केला.