'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:10 IST2025-09-29T13:08:44+5:302025-09-29T13:10:43+5:30
Asia Cup 2025 Ind vs Pak fina : ... या निर्णयासाठी मी भारतीय संघाचे आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचे आभार मानतो.

'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या वडिलांनी आशिया कप क्रिकेट स्पर्धेची ट्रॉफी न घेतल्याबद्दल भारतीय संघाचे कौतुक केले आहे. यासंदर्भात बोलताना विनय नरवाल यांचे वडील राजेश नरवाल म्हणाले, भारतीय संघाने असे करून अगदी योग्य संदेश दिला आहे की, खेळ वेगळी गोष्ट आहे, मात्र आम्ही आपल्यासोबत संपर्क ठेवणार नाही. भारतीय संघाने पाकिस्तानला दहशतवादासंदर्भात थेट मेसेज दिला आहे. या निर्णयासाठी मी भारतीय संघाचे आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचे आभार मानतो.
कर्णधार सूर्यकुमार यादवची मोठी घोषणा -
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कपमधील सर्व सामन्यांची संपूर्ण फीस पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातलगांना समर्पित केली. एवढेच नाही तर, माझी प्रार्थना नेहमीच पहलगाम हल्ल्यातील पीडितांसोबत राहील, असेही यादवने म्हटले आहे.
भारतीय संघाने खेळण्याचा निर्णय घेतला, पण -
खरे तर, आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळावे की नाही, यासंदर्भात बरीच चर्चा सुरू होती. अखेर बीसीसीआयने निर्णय घेतला की भारत मैदानात उतरेल. यासाठी, भारत मैदानात उतरला नाही, तर पाकिस्तानला वॉकओव्हर मिळेल, असे कारण देण्यात आले होते. यामुळे भारतीय संघाने खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले जाणार नाही, असे ठरवले होते.
याशिवाय भारतीय संघाने ट्रॉफी देखील पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्या हातून घेण्यास नकार दिला. हेच मोहसिन नकवी भारताविरोधात सातत्याने गरळ ओकत असतात.