केजरीवाल-सिसोदिया निर्दोष; अण्णा हजारेंकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:59 IST2026-02-27T16:58:45+5:302026-02-27T16:59:15+5:30
Arvind Kejriwal : 'ते आमचे जुने सहकारी आहेत. समाज आणि देशाच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते त्यांनी करत राहावे.'

केजरीवाल-सिसोदिया निर्दोष; अण्णा हजारेंकडून न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले...
Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह एकूण 23 जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत, तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले.
राउज एव्हेन्यू कोर्टाचा मोठा निर्णय
दिल्लीतील राउज एव्हेन्यू कोर्टाने दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अबकारी धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अन्य 21 आरोपींना दिलासा दिला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून, अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली आहे.
VIDEO | As the Rouse Avenue Court discharges former Delhi CM Arvind Kejriwal and his deputy Manish Sisodia in the excise policy case, social activist Anna Hazare says, “Our country runs on the strength of its judicial and security systems. Despite being such a large nation with… pic.twitter.com/xpBCMf7s7m
— Press Trust of India (@PTI_News) February 27, 2026
न्यायपालिका देशाचा कणा आहे- अण्णा हजारे
अण्णा हजारे म्हणाले, आपला देश न्यायव्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणांच्या बळावर चालतो. विविध पक्ष, जाती, धर्म आणि समुदाय असलेल्या या मोठ्या देशात न्यायपालिकेमुळेच व्यवस्था सुरळीत चालते. अन्यथा अराजकता माजेल. आता न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की, अरविंद केजरीवाल दोषी नाहीत, तर हा निर्णय स्वीकारला गेला पाहिजे.
पूर्वीची टीका न्यायालयीन निर्णय नव्हता
अण्णा हजारे यांनी याआधी केलेल्या विधानांवर स्पष्टीकरण देताना सांगितले, मी याआधी अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल जे काही बोललो, ते न्यायालयाचा निर्णय नव्हता. आपण सगळे अंदाजाने, हवेत बोलत होतो. जर तो न्यायालयाचा निर्णय असता, तर आम्ही असे बोललो नसतो. आता कोर्टाने सांगितले आहे की, केजरीवाल यांचा काहीही दोष नाही, तर ते मान्य करावेच लागेल.
राजकीय आरोपांवर भूमिका स्पष्ट
अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर आपल्या विरोधात कट रचून खोटे खटले दाखल केल्याचा आरोप केला होता. यावर अण्णा हजारे म्हणाले, तो त्यांचा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांशी माझा काहीही संबंध नाही. मी कधीच सत्तापक्षाच्या जवळ गेलो नाही. त्यांना जे म्हणायचे आहे, ते ते म्हणू शकतात.
केजरीवाल-सिसोदियांना अण्णा हजारे यांचा सल्ला
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना कोणता सल्ला द्याल, असे विचारले असता अण्णा हजारे म्हणाले, ते आमचे जुने सहकारी आहेत. समाज आणि देशाच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते त्यांनी करत राहावे. स्वतःचा किंवा पक्षाचा विचार करू नका, फक्त देश पुढे नेण्याचा विचार करा.