ईशान्य भारताला अस्थिर करण्यासाठी आलेल्या अमेरिकन सैनिकाची हादरवणारी पार्श्वभूमी; ख्रिश्चन स्टेटचा कट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:42 IST2026-03-18T19:40:10+5:302026-03-18T19:42:22+5:30

भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने एका मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग म्हणून सात परदेशी नागरिकांना अटक केली.

Arrest of US Mercenary Matthew VanDyke in India Ignites Christian State Conspiracy Theories | ईशान्य भारताला अस्थिर करण्यासाठी आलेल्या अमेरिकन सैनिकाची हादरवणारी पार्श्वभूमी; ख्रिश्चन स्टेटचा कट?

ईशान्य भारताला अस्थिर करण्यासाठी आलेल्या अमेरिकन सैनिकाची हादरवणारी पार्श्वभूमी; ख्रिश्चन स्टेटचा कट?

Matthew Vandyke:भारताच्या अंतर्गत सुरक्षेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा राष्ट्रीय तपास संस्थेने पर्दाफाश केला आहे. कोलकाता विमानतळावरून अमेरिकन भाडोत्री सैनिक मैथ्यू वैनडाईक आणि सहा युक्रेनियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केलेली ख्रिश्चन स्टेटची भीती आता वास्तवात येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

अटक करण्यात आलेले हे सातही परदेशी नागरिक टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. मात्र, पर्यटनाचा बहाणा करून त्यांनी गुवाहाटीमार्गे मिझोराममध्ये प्रवेश केला आणि तिथून बेकायदेशीरपणे म्यानमार गाठले. म्यानमारमधील बंडखोर गटांना शस्त्रे चालवण्याचे, ड्रोन हल्ल्यांचे आणि जॅमिंग तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे.

कोण आहे मैथ्यू वैनडाईक?

मैथ्यू वैनडाईक हा जागतिक स्तरावरील संघर्षांमधील एक वादग्रस्त चेहरा आहे. तो स्वतःला फिल्ममेकर सांगतो, पण प्रत्यक्षात तो युद्धांमध्ये पैशांसाठी लढणारा सैनिक आहे. २०११ मध्ये मुअम्मर गद्दाफीविरुद्धच्या युद्धात तो सामील होता, तिथे त्याला अटकही झाली होती. त्यानंतर त्याने सीरिया आणि ईराकच्या संघर्षातही भाग घेतला. त्याने 'सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल' नावाची संस्था स्थापन केली आहे, जी बंडखोर गटांना लष्करी प्रशिक्षण देते. २०२२ मध्ये त्याने युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिल्याचा दावा केला आहे.

शेख हसीना यांची ख्रिश्चन स्टेटची भविष्यवाणी आणि कनेक्शन

बांगलादेशातील सत्तांतरापूर्वी शेख हसीना यांनी एका माणसाचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला होता. बांगलादेशातील चितगाव, म्यानमारचा काही भाग आणि भारताचा ईशान्य भाग जोडून एक वेगळा ख्रिश्चन देश निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. एका परकीय शक्तीने त्यांना सत्तेत राहण्यासाठी एअरबेस बांधण्याची परवानगी मागितली होती, जी त्यांनी नाकारली होती. मैथ्यू वैनडाईक हा ख्रिश्चन धर्माचा कट्टर समर्थक असून त्याने भारतात ख्रिश्चनांवर अत्याचार होत असल्याचा प्रचार २०१९ मध्ये केला होता. त्यामुळे तो या मोठ्या कटाचा भाग असल्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवत आहेत.

एनआयएच्या तपासातील महत्त्वाचे मुद्दे

आरोपींनी युरोपमधून ड्रोन्सची मोठी खेप आणून ती म्यानमारमधील बंडखोर गटांना आणि मिझोराममधील काही संशयास्पद गटांना पुरवल्याचा आरोप आहे. भारतात सक्रिय असलेल्या दहशतवादी टोळ्यांना आर्थिक रसद पुरवल्याचाही त्यांच्यावर संशय आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मार्च २०२५ मध्ये विधानसभेत सांगितले होते की, युक्रेन युद्धातील अनुभवी सैनिक मिझोराममार्गे म्यानमारमध्ये प्रशिक्षणासाठी जात आहेत.

दरम्यान याप्रकरणी अमेरिकन दूतावासाने गोपनीयतेचे कारण देत यावर अधिकृत भाष्य करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे युक्रेनच्या राजदूतांनी भारताकडे विरोध दर्शवत आपल्या नागरिकांना राजनैतिक प्रवेश देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Arrest of US Mercenary Matthew VanDyke in India Ignites Christian State Conspiracy Theories