टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 21:56 IST2025-08-18T21:55:11+5:302025-08-18T21:56:09+5:30

कपिल सिंह यांना मारहाण होताना चुलत भाऊ शिवम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कर्मचाऱ्यांनी शिवमलाही मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Army personnel beaten up at meerut toll plaza, NHAI takes major action; fined Rs 20 lakh, along with... | टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...

टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...

नवी दिल्ली - मेरठ करनाल राष्ट्रीय महामार्गावर भुनी टोल नाक्यावर १७ ऑगस्टच्या रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली. याठिकाणी टोल कर्मचाऱ्यांनी भारतीय सैन्यातील जवान कपिल सिंह आणि त्यांच्या भावाला बेदम मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. आता या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोल कंत्राटदार कंपनीवर कठोर कारवाई केली आहे. NHAI ने मेसर्स धरम सिंह अँन्ड कंपनीवर २० लाखांचा दंड ठोठावत संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मेरठच्या गोटका गावातील रहिवासी सैन्यातील जवान कपिल सिंह १७ ऑगस्टला रात्री चुलत भावासोबत दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला चालले होते. श्रीनगरला त्यांना ड्युटी ज्वाईन करायची होती. भुनी टोल नाक्यावर वाहनांची मोठी रांग होती. वेळ निघून जात असल्याने कपिल यांनी टोल कर्मचाऱ्यांना वाहन लवकर सोडण्याची विनंती केली. यावरूनच टोल नाका कर्मचारी आणि सैन्य जवान कपिल सिंह यांच्यात वाद झाला. त्यानंतर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी जवानासोबत मारहाण केली. कर्मचाऱ्यांनी कपिलला खांबाला बांधून लाठी काठीने मारले. 

कपिल सिंह यांना मारहाण होताना चुलत भाऊ शिवम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कर्मचाऱ्यांनी शिवमलाही मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला. घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी टोल नाक्यावर गर्दी केली आणि टोल कर्मचाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त करत तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. मेरठ पोलिसांनी या घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला असून काही आरोपींना पकडण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

NHAI नं कंपनीवर केली कारवाई

या प्रकाराची दखल घेत NHAI ने तातडीने टोल जमा करणाऱ्या कंपनीवर २० लाखांचा दंड ठोठावला आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यात आणि टोल प्लाझावर सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली, जे कराराचे मोठे उल्लंघन आहे. आम्ही अशा वर्तनाचा तीव्र निषेध करतो आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रवाशांचा सुरक्षित आणि अखंड प्रवास सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत असं एनएचएआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे. 

Web Title: Army personnel beaten up at meerut toll plaza, NHAI takes major action; fined Rs 20 lakh, along with...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.