हृदयस्पर्शी! भावाची उणीव भासू नये म्हणून शहीद जवानाच्या बहिणीच्या लग्नात पोहचलं बटालियन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:09 IST2025-10-04T10:09:05+5:302025-10-04T10:09:35+5:30
याच भावनिक क्षणावेळी आशिषचे सहकारी आणि परिसरातील माजी सैनिक लग्नात सहभागी झाले होते. त्यांनी केवळ लग्नात हजेरी लावली नाही तर बहिणीला सन्मानाने आणि प्रेमाने निरोप दिला

हृदयस्पर्शी! भावाची उणीव भासू नये म्हणून शहीद जवानाच्या बहिणीच्या लग्नात पोहचलं बटालियन
सिरमौर - हिमाचल प्रदेशच्या सिरमौर परिसरात भोज येथील भरली गावात अलीकडेच एक हृदयस्पर्शी घटना पाहायला मिळाली. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. एका लग्न सोहळ्यातील मुलीच्या पाठवणी वेळी प्रत्येक जण भावूक पाहायला मिळाले. एका शहीद जवानाच्या बहिणीचं हे लग्न हेते.
लग्न पार पडलं आणि मुलीची पाठवणी सुरू होती तेव्हा घरच्यांसह सगळे भावूक झाले. प्रत्येक बहिणीला तिचा भाऊ याक्षणी आपल्यासोबत असायला हवा असं वाटत असते, जो तिच्या डोळ्यातील अश्रू पुसेल आणि हसत हसत बहिणीला निरोप देईल. मात्र या बहिणीच्या नशिबात ते क्षण नव्हते, कारण तिचा फौजी भाऊ आता या जगात नाही. शहीद जवान आशिष कुमार याच्या बहिणीचं लग्न होते. ऑगस्ट २०२४ मध्ये अरूणाचल प्रदेशातील सैन्य ऑपरेशनमध्ये देशाचं रक्षण करताना त्याला वीरमरण आले. आशिषचं बलिदान ना केवळ त्याच्या कुटुंबासाठी तर संपूर्ण परिसरात अभिमानाचा विषय होता. बहिणीच्या लग्नावेळी आशिषची उणीव सगळ्यांनाच भासत होती.
याच भावनिक क्षणावेळी आशिषचे सहकारी आणि परिसरातील माजी सैनिक लग्नात सहभागी झाले होते. त्यांनी केवळ लग्नात हजेरी लावली नाही तर बहिणीला सन्मानाने आणि प्रेमाने निरोप दिला. भाऊ बहिणीच्या लग्नात जसं वावरतो तसं इथं सैनिक वावरत होते. बहिणीची पाठवणी करण्याची वेळ आली तेव्हा या सैनिक भावांनी तिला साथ दिली. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असणाऱ्यांचे डोळे पाण्याने भरले. शहीद आशिष कुमारचे २ भाऊ आहेत, ते शेती करतात. आशिष लष्करात भरती झाला होता. बहिणीच्या लग्नात जेव्हा आशिषची उणीव भासू लागली तेव्हा त्याच्या सहकारी जवानांनी ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घेतली. बहिणीच्या पाठवणीवेळी तिच्या डोक्यांवर फुलांची माळ घेऊन ते चालत होते.
सैन्याची वर्दी घालून जवान एका कुटुंबातील कर्तव्य निभावत होते. भावाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळे सैन्य केवळ एक संस्था नाही तर कुटुंब आहे याची प्रचिती सगळ्यांना आली. जेव्हा एक जवान शहीद होतो तेव्हा त्याच्यामागे संपूर्ण बटालियन त्याच्या कुटुंबासोबत उभे राहते हे चित्र या निमित्ताने गावकऱ्यांनी पाहिले.