हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या जवानाला अटक; संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 13:03 IST2019-01-13T13:02:53+5:302019-01-13T13:03:05+5:30
पाळत ठेवून जवानाला अटक; जयपूरमध्ये चौकशी सुरू

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या जवानाला अटक; संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप
जसलमेर: राजस्थानच्या जसलमेरमधून एका भारतीय जवानाला अटक करण्यात आली आहे. भारतीय सैन्यासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप या जवानावर आहे. महिला एजंटच्या जाळ्यात अडकलेल्या जवानानं व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित जवानाला अटक करण्यात आली. या जवानाला आता चौकशीसाठी जयपूरला आणण्यात आलं आहे.
राजस्थानचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) उमेश मिश्र यांनी या माहितीला दुजोरा दिला. सोमवीर नावाच्या जवानाला शुक्रवारी संध्याकाळी अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्याला जयपूरला आणण्यात आलं. सध्या त्याची पोलीस चौकशी सुरू आहे. सोमवीर सोशल मीडियाच्या माध्यमातून गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पोलीस आणि लष्कराला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचं एक विशेष पथक आणि लष्कराच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी त्याच्यावर नजर ठेवून होते.
पाकिस्तानमधील एका महिलेनं जवानाला हनी ट्रॅप केल्याची माहिती लष्कर आणि पोलिसांनी मिळाली होती. सोमवीर या महिलेला सैन्याशी संबंधित गुप्त माहिती पुरवत होता. सोमवीर या महिलेला प्रशिक्षणादरम्यान भेटल्याची माहिती चौकशीतून समोर आली. जसलमेरमध्ये तैनात झाल्यावर सोमवीरनं संबंधित महिलेला संवेदनशील माहिती व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून दिल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच सोमवीरवर पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली, असं त्यांनी सांगितलं.