'सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे'; पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:21 IST2025-08-27T16:20:40+5:302025-08-27T16:21:45+5:30
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'ऑपरेशन सिंदूर' साठी तिन्ही दलांचे कौतुक केले. 'ऑपरेशन भारताच्या स्वदेशी प्लॅटफॉर्म, उपकरणे आणि शस्त्रास्त्र प्रणालींच्या यशाचे एक उत्तम उदाहरण म्हणून उदयास आले', असंही सिंह म्हणाले.

'सशस्त्र दलांनी दीर्घ संघर्षासाठी तयार राहावे'; पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव वाढला आहे. भारताने सिंधू जल करार रद्द केला आहे. दरम्यान, आता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक मोठे विधान केले आहे. 'देशाच्या सशस्त्र दलांनी अल्पकालीन संघर्षांपासून ते पाच वर्षांच्या युद्धापर्यंतच्या सर्व प्रकारच्या सुरक्षा आव्हानांसाठी सज्ज असले पाहिजे, कारण सध्याची अप्रत्याशित भू-राजकीय परिस्थिती पाहता, असं विधान सिंह यांनी केले.
महू लष्करी छावणीतील आर्मी वॉर कॉलेजमध्ये 'रण संवाद २०२५' या त्रिसेवेच्या संयुक्त चर्चासत्राच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी बोलताना सिंह यांनी हे विधान केले. सिंह म्हणाले की, भारताला कोणाचीही जमीन नको आहे परंतु आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे.
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
'आजच्या युगात युद्धे इतकी अचानक आणि अप्रत्याशित झाली आहेत की युद्ध कधी संपेल आणि किती काळ चालेल हे सांगणे खूप कठीण आहे. भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असले पाहिजे', असंही राजनाथ सिंह म्हणाले.
संरक्षण मंत्री म्हणाले, "जर युद्ध दोन महिने, चार महिने, एक वर्ष, दोन वर्षे, अगदी पाच वर्षे चालले तर आपण त्यासाठी पूर्णपणे तयार असले पाहिजे." 'राष्ट्रीय सुरक्षा आता केवळ लष्कराचा विषय राहिलेली नाही तर ती "संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टिकोनाचा मुद्दा बनली आहे, यावर सिंह यांनी भर दिला.
राजनाथ सिंह म्हणाले, 'आम्हाला कोणाचीही जमीन नको आहे, परंतु आमच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाण्यास तयार आहोत. यावेळी भारताचे संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्यासह उच्च लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.