आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 16:56 IST2025-05-18T16:55:55+5:302025-05-18T16:56:18+5:30

Pakistani Spy News: भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असतानाच पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात असलेल्या ज्योती मल्होत्रा या तरुणीला सुरक्षा यंत्रणांनी काल अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच सुरक्षा यंत्रणांनी हरयाणामधील नूंह येथून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकल्या आहेत.

Another Pakistani spy arrested, Armaan, who provided India's confidential information to ISI, arrested | आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  

आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले असतानाच पाकिस्तानी हेरांच्या संपर्कात असलेल्या ज्योती मल्होत्रा या तरुणीला सुरक्षा यंत्रणांनी काल अटक केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच सुरक्षा यंत्रणांनी हरयाणामधील नूंह येथून आणखी एका पाकिस्तानी गुप्तहेराला बेड्या ठोकल्या आहेत. हरयाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी नूंह जिल्ह्यातून एका तरुणाला अकट केली आहे. अरमान असं या पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आरोपीचं नाव असून, त्याच्याविरोधात देशद्रोहाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार अरमान हा बऱ्याच काळापासून भारतीय लष्कर डिफेन्स एक्स्पो २०२५ आणि लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवत होता. ही माहिती देशाचं संरक्षण आणि रणनीतिक तयारीच्या दृष्टीने गंभीर आव्हान होती. एक तरुण सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देशाच्या शत्रूंना माहिती पुरवत आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे त्वरित कारवाई करत पोलिसांनी अरमान याला ताब्यात घेतलं आहे.

अरमानच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता पाकिस्तानच्या +९२ क्रमांकाने सुरू होणाऱ्या फोन नंबरवर चॅट, कॉल लॉग, फोटो आणि व्हिडीओ सापडले. त्यातही विशेष करून डिफेन्स एक्स्पो २०२५ चे फोटो आणि लष्करी हालचालींशी संबंधित इतर  माहितीही मिळाली. आरोपीकडून दोन मोबाईल फोन आणि दोन सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. यांचा वापर आरोपी हेरगिरीसाठी करत होता. त्याशिवाय अन्य एका मोबाईल फोनवरूनही आरोपी संशयास्पद हालचाली करत होता. आता अरमानचं हे नेटवर्क किती मोठं होतं आणि त्यात कोण कोण सहभागी होतं, याचा शोध पोलीस आणि केंद्रीय तपाय यंत्रणांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरमान याने लष्करी तळ, संरक्षणविषयक कार्यक्रम आणि लष्कराच्या संभाव्य हालचालींची माहिती आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती आयएसआयला दिली होती. ही माहिती सामरिकदृष्ट्या महत्त्वाची होती. आता या प्रकरणी आरोपीविरोधात भादंवि कलम १५२ आणि ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट, १९२३ आणि देशद्रोहाशी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 

Web Title: Another Pakistani spy arrested, Armaan, who provided India's confidential information to ISI, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.