सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:50 IST2025-05-21T11:58:28+5:302025-05-21T12:50:05+5:30
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. अबूझमाड परिसरात सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत २६ नक्षलवादी मारले गेल्याचं वृत्त आहे.

सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या काही भागांत मागच्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांकडून धडाकेबाज मोहिमा सुरू आहेत. या कारवाईच्या माध्यमातून अनेक भागातून नक्षलवाद्यांना हुसकावून लावण्यात सुरक्षा दलाला यश मिळालं आहेत. तसेच या चकमकींमध्ये अनेक नक्षवलादी मारले जात आहेत. दरम्यान, छत्तीसगडमधील बिजापूर परिसरात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठ्या चकमकीला सुरुवात झाली आहे. अबूझमाड परिसरात सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत २६ नक्षलवादी मारले गेल्याचं वृत्त आहे. तसेच चकमक अद्याप सुरू असल्याने मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते अशी शक्यताही वर्तवली जात आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षली नेता वसावा राजू याचाही समावेश असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
Chhattisgarh | Encounter underway between DRG jawans and Naxals in the forest area of Abujhmad in Narayanpur, says a Police official.
— ANI (@ANI) May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूर, बिजापूर आणि दंतेवाडा डीआरजीचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे. घटनास्थळी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू आहे. तसेच डीआरजीच्या जवानांनी काही बड्या नक्षलवादी नेत्यांना घेराव घातल्याचं वृत्त आहे. तसेच या चकमकीत नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस वसावा राजू हा मारला गेल्याचेही सांगण्यात येत आहे.
वसवा राजू हा वयस्कर नक्षली नेता असून, तो दंडकारण्यामध्ये नक्षलवादी चळवळीची पायाभरणी करणाऱ्यांपैकी एक होता. मागच्या अनेक वर्षांपासून तो माड येथे लपलेला होता. तसेच त्याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचं बक्षीस सरकारने लावलेलं होतं. आजच्या चकमकीवेळी सुरक्षा दलांच्या जवानांनी नक्षलवाद्यांच्या सर्वात गोपनीय अड्ड्यावर हल्ला केला. आता वसावा राजू मारला गेल्याचं अधिकृतपणे समोर आलं तर सुरक्षा दलांना मिळालेलं ते मोठं यश असेल.