उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:04 IST2025-12-12T11:02:48+5:302025-12-12T11:04:15+5:30
सौदी अरेबियात काम करणारा रशीद अली दोन महिन्यांपूर्वी एका बांगलादेशी महिलेला घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
उत्तर प्रदेशात अवैध स्थलांतरितांविरुद्ध सुरू असलेल्या 'ऑपरेशन टॉर्च' मोहिमेअंतर्गत अमरोहा येथील मंडी धनौरा येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंडी धनौरा येथे बेकायदेशीरपणे राहत असलेल्या बांगलादेशी महिला रीना बेगम आणि तिचा भारतीय पती रशीद अली यांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.
नेपाळमार्गे भारतात प्रवेश
गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांनी दोघांचीही कसून चौकशी केली. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. बांगलादेशी रीना बेगम आणि रशीद अली यांनी काही वर्षांपूर्वी सौदी अरेबियात विवाह केला होता. रीना बेगम ऑक्टोबर २०२५ मध्ये तिच्या पतीसोबत नेपाळमार्गे भारतात दाखल झाली आणि मंडी धनौरा येथील मोहल्ला कटरा येथे राहत होती.
सुरुवातीला रीनाने आपण पश्चिम बंगालची रहिवासी असल्याचे सांगून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण तिने नंतर सत्य कबूल केले. ती बांगलादेशातील ढाका जिल्ह्यातील गाजीपूरची रहिवासी आहे.
गुप्तचर संस्थांची चौकशी
रशीद अली हा सौदी अरेबियात काम करतो. तो एका बांगलादेशी महिलेला सोबत घेऊन भारतात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने दोघांनाही ताब्यात घेऊन वरिष्ठ अधिकारी आणि गुप्तचर संस्थांना माहिती दिली. गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून लग्नाचे प्रमाणपत्र जप्त केले आणि त्यांची कसून चौकशी केली.
गुन्हा दाखल
पोलिसांनी बांगलादेशी महिला रीना बेगम हिच्याविरुद्ध परदेशी कायद्यांतर्गत आणि तिला बेकायदेशीरपणे आश्रय दिल्याबद्दल तिचा पती रशीद अलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशात अवैधपणे राहणाऱ्या स्थलांतरितांना शोधून काढण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार विविध जिल्ह्यांमध्ये 'ऑपरेशन टॉर्च' ही मोहीम जोमाने सुरू आहे. ही अटक त्याच मोहिमेचा एक भाग आहे.