काँग्रेस आमदाराने शेकडोच्या जमावासह पोलीस ठाण्याला घातला घेराव; रागाने फाडले कपडे अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 11:12 IST2023-02-26T11:02:16+5:302023-02-26T11:12:48+5:30
आमदार लखन घनघोरिया यांच्यासह शेकडो लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलीस अधिकार्यांशी संभाषण सुरू असताना आमदार संतापले.

फोटो - news18 hindi
काँग्रेस आमदाराने जबलपूर पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. आमदार लखन घनघोरिया यांच्यासह शेकडो लोकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. पोलीस अधिकार्यांशी संभाषण सुरू असताना आमदार संतापले. त्यानंतर आमदारांनी पोलिसांवर ताशेरे ओढले. रागाच्या भरात त्याने शर्ट फाडला. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मक्का नगर येथे राहणारी अल्पवयीन मुलगी व मुलगा अचानक घरातून पळून गेले. ते थेट आसिफ कादरी नावाच्या व्यक्तीच्या घरी पोहोचले. आसिफ हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याने अल्पवयीन मुलीच्या वडिलांना घरी बोलावून दोन्ही बाजूंमध्ये संभाषण करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी संशयाच्या आधारे आसिफला ताब्यात घेतले. चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. याची माहिती आमदारांना कळताच त्यांनी शेकडो समर्थकांसह पोलीस ठाणे गाठले.
गदारोळ झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्याला पोलिसांनी सोडून दिले. पकडलेल्या तरुणाचा मुलीच्या पलायनाशी काहीही संबंध नाही, असे आमदाराचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याला बळजबरीने ताब्यात घेतले. त्याचवेळी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर सातत्याने बेकायदा खंडणीच्या तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. लोकांना त्रास देणे ही पोलिसांची सवय झाली असल्याचे आमदार सांगतात. या परिसरात गांजा, चरस, याची खुलेआम विक्री होत आहे, मात्र पोलीस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.
आमदार म्हणाले की, दारू माफिया कोणतीही भीती न बाळगता अवैधरित्या दारूविक्री करत आहेत. मात्र पोलीस केवळ वाहन तपासणी पुरते मर्यादित आहेत. एकंदरीत पोलीस कायद्याच्या नावाखाली जनतेला त्रास देत असून गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत. दुसरीकडे, सीएसपी अखिलेश गौर म्हणतात की, आमदारांनी केलेल्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जाईल आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याचाही प्रयत्न केला जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"