सरकारी कार्यालयात फेऱ्या मारणं होणार बंद, जन्म-मृत्यू दाखला मिळणार व्हॉट्सॲपवर, आंध्र प्रदेश सरकारचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 15:00 IST2025-01-21T14:59:32+5:302025-01-21T15:00:12+5:30
Birth-death certificates via WhatsApp : सोमवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह रिअल-टाइम गव्हर्नन्स सोसायटी (RTGS) कार्यालयात या प्रक्रियेचा आढावा बैठक घेण्यात आली.

सरकारी कार्यालयात फेऱ्या मारणं होणार बंद, जन्म-मृत्यू दाखला मिळणार व्हॉट्सॲपवर, आंध्र प्रदेश सरकारचा उपक्रम
Birth-death certificates via WhatsApp : तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबीयांनी जन्म किंवा मृत्यूचा दाखला काढण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारल्या असतील, पण आता या अडचणी कमी करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकार एक चांगली योजना सुरू करणार आहे. या योजनेनंतर नागरिकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून तुमच्या मोबाईलवर तुमचा जन्म आणि मृत्यूचा दाखला मिळू शकतो.
सध्याच्या काळातील स्मार्टफोनच्या दुनियेत, कॅम्प्युटरच्या जमान्यात आता सर्वच कामं ऑनलाइन होऊ लागली आहेत. यामुळे कोणतेही सरकारी किंवा निमसरकारी काम सहज होऊ लागलं आहे. अशातच आता आंध्र प्रदेश सरकार लवकरच आपल्या 'व्हॉट्सॲप गव्हर्नन्स सर्व्हिसेस' अंतर्गत व्हॉट्सॲपद्वारे जन्म आणि मृत्यू दाखला देणार आहे. या संदर्भातील घोषणा सोमवारी (२० जानेवारी) मुख्य सचिव के. विजयानंद यांनी केली.
या सेवेची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस तेनाली येथे एक पायलट प्रोजेक्ट राबविला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, के. विजयानंद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या उद्दिष्टांनुसार राज्य सरकार लवकरच लोकांना व्हॉट्सॲप प्रशासन सेवा प्रदान करणार आहे. याअंतर्गत, लोकांना लवकरच व्हॉट्सॲपपद्वारे जन्म आणि मृत्यू दाखला मिळू शकेल.
सोमवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह रिअल-टाइम गव्हर्नन्स सोसायटी (RTGS) कार्यालयात या प्रक्रियेचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी के. विजयानंद यांनी यावर भर दिला की, व्हॉट्सॲप गव्हर्नन्स सुरू करून सरकारी सेवा अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच,आरटीजीएस आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
याचबरोबर, या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी के. विजयानंद यांनी पंचायती राज, आरोग्य आणि नगरपालिका प्रशासन विभागांना आरटीजीएस अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आता जन्म आणि मृत्यूचा दाखला व्हॉट्सॲपद्वारे मिळणार आहे. त्यामुळे हे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत जाण्याचे काहीही कारण नाही. नागरिक घरबसल्या आपल्या मोबाईलवरूनच हे महत्त्वाचे काम करू शकतात.