धक्कादायक! ऑटोवर विजेची तार पडली; 7 जणांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 16:13 IST2022-06-30T16:13:22+5:302022-06-30T16:13:36+5:30
तार पडताच ड्रायव्हर आणि इतर 5 प्रवाशांनी ऑटोतून उडी मारुन आपला जीव वाचवला.

धक्कादायक! ऑटोवर विजेची तार पडली; 7 जणांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर
सत्यसाई:आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी हाय टेंशन वायर पडल्याने एका ऑटोला आग लागली. शेतात कामाला जाणारे कामगार या ऑटोमध्ये बसले होते. यापैकी 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ड्रायव्हर आणि इतर 5 प्रवाशांनी ऑटोतून उडी मारून आपला जीव वाचवला.
मजूर शेतात कामाला जात होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारील गावातील एका शेतकऱ्याने मजुरांना बोलावले होते. हे सर्वजण सात सीटर ऑटोमधून जात होते. यावेळी अचानक विजेची ऑटोवर पडली आणि ऑटोने पेट घेतला. ताडीमारी मंडलच्या चिलाकोंडैपल्ली गावाजवळ हा अपघात झाला. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला.
मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची भरपाई
या घटनेत लक्ष्मी नावाच्या महिलेला वाचवण्यात यश आले आहे, मात्र तिची प्रकृती चिंताजनक आहे. मृत हे गुड्डमपल्ली गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाने उडी मारुन जीव वाचवला. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.