andhra pradesh man killed his wife being upset her habit of making tiktok video in vijayawada | TikTok चं वेड जिवाशी खेळ, पत्नी सतत व्हिडीओ करत असल्याने पतीचं टोकाचं पाऊल
TikTok चं वेड जिवाशी खेळ, पत्नी सतत व्हिडीओ करत असल्याने पतीचं टोकाचं पाऊल

ठळक मुद्देपत्नीच्या टिकटॉक वेडाला कंटाळलेल्या पतीने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विजयवाड्यामधील कनिगिरी प्रकाशम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. टिकटॉकवरून चिन्नापाचू आणि फातिमा यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली होती.

विजयवाडा - टिकटॉक या अ‍ॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. टिकटॉकवर व्हिडीओ तयार करण्याच्या नादात अनेकदा आसपासच्या परिस्थितीचे लोकांना भान राहत नाही. मात्र टिकटॉकची आवड एका महिलेच्या जिवावर बेतली आहे. आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे अशीच एक धक्कादाक घटना घडली आहे. पत्नीच्या टिकटॉक वेडाला कंटाळलेल्या पतीने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विजयवाड्यामधील कनिगिरी प्रकाशम जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या टिकटॉक व्हिडीओ करण्याच्या सवयीला वैतागलेल्या पतीने गळा दाबून तिची हत्या केली आहे. चिन्नापाचू साहिब आणि फातिमा असं या पती-पत्नीची नावं आहेत. फातिमाचा मृतदेह घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने सुरुवातीला तिने आत्महत्या केली असल्याचं पोलिसांना वाटलं. मात्र मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. फातिमाचा मृत्यू हा आत्महत्येमुळे नाही तर गळा दाबून करण्यात आल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी फातिमाबाबत शेजारी आणि नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी चिन्नापाचू साहिब आणि फातिमा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद होत असल्याची माहिती मिळाली. फातिमाला टिकटॉकची प्रचंड क्रेझ होती. ती नेहमीच त्यावर वेगवेगळे व्हिडीओ पाहत असे. तसेच स्वत: ही व्हिडीओ तयार करत होती. सुरुवातीला चिन्नापाचूला पत्नीने व्हिडीओ केलेला आवडायचा. त्याला तिचं कौतुकही होतं. मात्र काही दिवसांनी फातिमा जास्तीत जास्त वेळ हा काम करण्याऐवजी टिकटॉकसाठीच खर्च करू लागली.

टिकटॉकच्या नादापायी तिचे घराकडे दुर्लक्ष होत असे. यामुळे टिकटॉकवरून चिन्नापाचू आणि फातिमा यांच्यात वाद होण्यास सुरुवात झाली होती. पतीने अनेकदा तिला समजावण्याच प्रयत्न केला मात्र तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. हत्येच्या दिवशी देखील चिन्नपाचू घरी आला त्यावेळी फातिमा व्हिडीओ तयार करण्यात व्यस्त होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात त्याने फातिमाची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह पंख्याला लटकला. फातिमाने आत्महत्या केली असल्याचं त्याने इतरांना भासवलं. मात्र शवविच्छेदनामध्ये तिची हत्या झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांना चिन्नापाचूची कसून चौकशी केली असता त्याने पत्नीची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. 
 

Web Title: andhra pradesh man killed his wife being upset her habit of making tiktok video in vijayawada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.