भयंकर! भेसळयुक्त दूध प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू; आंध्र प्रदेशातील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:05 IST2026-03-13T10:05:00+5:302026-03-13T10:05:47+5:30
Andhra Pradesh Adulterated Milk Deaths: आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात भेसळयुक्त दुधामुळे १३ जणांचा बळी गेला आहे. दुधात युरियाची भेसळ असल्याचा संशय असून अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत. वाचा सविस्तर वृत्त.

भयंकर! भेसळयुक्त दूध प्यायल्याने १३ जणांचा मृत्यू; आंध्र प्रदेशातील घटनेने खळबळ
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. कथितरीत्या भेसळयुक्त दूध प्यायल्यामुळे तब्बल १३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून अन्न सुरक्षा विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कोरुकोंडा मंडल क्षेत्रातील एका गावात ही घटना घडली. २२ फेब्रुवारीच्या सुमारास काही वृद्धांना उलट्या, पोटदुखी आणि लघवी होण्यास त्रास होऊ लागला. प्राथमिक तपासात या रुग्णांच्या किडनीमध्ये गंभीर समस्या निर्माण झाल्याचे दिसून आले, ज्यासाठी तातडीने डायलिसिसची गरज भासली. अधिक तपास केला असता, या सर्वांनी एकाच डेयरीतून दूध खरेदी केल्याचे समोर आले.
दुधामध्ये युरियाची भेसळ?
अन्न सुरक्षा विभागाने 'वरलक्ष्मी मिल्क डेयरी'तून दुधाचे नमुने गोळा केले होते. तपासणीत या दुधामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. बाधितांच्या रक्त आणि लघवीच्या चाचणीत युरिया आणि सीरम क्रिएटिनिनचे प्रमाण धोकादायक पातळीवर आढळले आहे. या डेयरीने परिसरातील सुमारे १०६ कुटुंबांना दूध पुरवठा केला होता.
प्रशासनाची कारवाई
संबंधित डेयरी युनिट तात्काळ सील करण्यात आले आहे. संशयित आरोपी अड्डाला गणेश्वरराव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बाधित भागात आपत्कालीन वैद्यकीय शिबिरे लावण्यात आली असून रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात केली आहे. या घटनेनंतर केवळ आंध्र प्रदेशच नव्हे, तर शेजारील तेलंगणा राज्यातही दुध डेअरींची तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.