पाकिस्तानच्या तुरुंगातील महिलेवर फिदा झाला अन् थेट सीमा पार करायला निघाला भारताचा बीटेक ग्रॅजुएट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:28 IST2025-12-08T11:25:24+5:302025-12-08T11:28:04+5:30
हा तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी सीमेपलीकडे पाकिस्तानात घुसण्याचा प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे, २०१७ मध्येही तो एकदा पाकिस्तानात गेला होता.

पाकिस्तानच्या तुरुंगातील महिलेवर फिदा झाला अन् थेट सीमा पार करायला निघाला भारताचा बीटेक ग्रॅजुएट!
राजस्थानमधील भारत-पाकिस्तान सीमेवर एका बीटेक पदवीधर तरुणाला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहे. हा तरुण प्रेयसीला भेटण्यासाठी सीमेपलीकडे पाकिस्तानात घुसण्याचा प्रयत्न करत होता, असे त्याने तपास यंत्रणांना सांगितले आहे. विशेष म्हणजे, २०१७ मध्येही तो एकदा पाकिस्तानात गेला होता. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील खाजूवाला सेक्टरमध्ये शुक्रवारी एक अत्यंत विचित्र घटना समोर आली. आंध्र प्रदेशातील एका बीटेक पदवीधर तरुणाला सुरक्षा दलांनी पाकिस्तानमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना पकडले आहे.
आरोपीचे नाव प्रशांत वेदम असून तो विशाखापट्टणमचा रहिवासी आहे. जवानांनी ताब्यात घेतल्यावर त्याने सुरक्षा यंत्रणांना जे सांगितले, ते ऐकून सर्वचजण चक्रावले. प्रशांतने सांगितले की, तो पाकिस्तानात राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता.
बसमधून उतरला आणि थेट सीमेकडे...
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत वेदम शुक्रवारी दुपारी खाजूवाला येथे एका बसमधून उतरला आणि थेट आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने चालू लागला. आर्मी कॅम्पच्या चेक १७ जवळ सैनिकांना त्याचे वर्तन संशयास्पद वाटले आणि त्यांनी त्याला थांबवले. थोड्या चौकशीनंतर त्याला खाजूवाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
खाजूवालाचे एसएचओ हरपाल सिंग यांनी सांगितले की, प्रशांत वेदम नावाचा हा व्यक्ती उघडपणे पाकिस्तानला जाण्याची आणि सीमा पार करण्यासाठी सोपा मार्ग शोधण्याची गोष्ट करत होता. आर्मी इंटेलिजन्सला ही माहिती मिळाल्यावर त्याला त्वरित पकडण्यात आले. तो आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून थेट भारत-पाकिस्तान सीमेवर आला होता.
कोण आहे त्याची 'ही' प्रेयसी?
पोलीस आणि तपास अधिकारी प्रशांतच्या दाव्यावर संशय व्यक्त करत आहेत. त्याने चौकशीदरम्यान सांगितले की, तो रावळपिंडी येथे राहणाऱ्या प्रविता नावाच्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात जात होता. 'द इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, प्रशांतने पोलिसांना सांगितले की, तो तुरुंगात असताना त्याला दुसऱ्या सेलमध्ये असलेल्या एका महिलेवर प्रेम झाले होते आणि आता तो तिला भेटायला परत जात आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, प्रशांतने तपास अधिकाऱ्यांसमोर दावा केला की, त्याची प्रविताशी सुमारे १० वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती.
२०१९ पर्यंत होता पाकिस्तानी ताब्यात
प्रशांतची ही पहिलीच प्रेम यात्रा नाही. प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी २०१७ मध्येही तो बिकानेरमधील करणी पोस्टमार्गे पाकिस्तानात घुसला होता. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याने त्याला अटक केली आणि तो २०२१ पर्यंत त्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर त्याला अटारी सीमेमार्गे भारतात परत पाठवण्यात आले होते. प्रशांत पुन्हा एकदा सीमेपलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याच्या प्रेमाच्या दाव्यावर तपास यंत्रणांना संशय आहे.
कुटुंबाने केला मानसिक आरोग्य ठीक नसल्याचा दावा
दरम्यान, प्रशांतच्या कुटुंबाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. एसएचओ हरपाल सिंग यांनी सांगितले की, प्रशांतचा भाऊ अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी खाजूवाला येथे येण्यासाठी निघाला आहे. त्याच्या भावाने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, प्रशांतला काही मानसिक आरोग्य समस्या आहेत. बीटेक पदवीधर असलेला प्रशांत चीन आणि आफ्रिकेतही काम केले आहे. सध्या त्याला खाजूवाला येथील एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. विविध गुप्तचर संस्था एकत्र येऊन त्याची कसून चौकशी करत आहेत.