Among the poor performers Raloa's seven chief ministers, Uddhav Thackeray's performance in the state is better than that of Prime Minister Modi | खराब कामगिरी असलेल्यांत रालोआचे सात मुख्यमंत्री, राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस

खराब कामगिरी असलेल्यांत रालोआचे सात मुख्यमंत्री, राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस

नवी दिल्ली : देशातील खराब कामगिरी असलेल्या पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सात मुख्यमंत्री असून त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आदींचा समावेश आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री, तर उत्तराखंडचे भाजपचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत हे सर्वांत अप्रिय मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा सरस ठरली आहे.

देशातील पहिल्या दहा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये बिगरभाजप सात मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या कामगिरीचा व लोकप्रियतेचा आढावा घेण्यासाठी आयएएनएस सी-व्होटर स्टेट ऑफ दी नेशन-२०२१ हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील निष्कर्षात म्हटले आहे की, नजीकच्या काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आसाम, केरळ, पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्र्यांनी उत्तम काम केले असून त्याचे प्रमाण यासंदर्भातील राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. तामिळनाडू, पुडुचेरी येथील मुख्यमंत्र्यांची कामगिरी सुमार असून सत्ताधीशांविरोधी जनमताचा फटका या सरकारांना निवडणुकांमध्ये बसू शकतो.

नवीन पटनायक यांच्यानंतर देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचा क्रमांक लागतो. सर्वात अप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी मात्र त्यांच्या राज्यात पंतप्रधानांपेक्षाही सरस ठरली आहे. आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, ओदिशा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता मोदी यांच्यापेक्षाही जास्त आहे. 

पंजाबमध्ये मोदी सर्वांत अप्रिय नेते -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कारकीर्दीतही त्यांची लोकप्रियता अनेक राज्यांत टिकून आहे. ४४.५५ टक्के लोकांचे मोदींविषयी चांगले मत आहे. सर्व राज्यांपैकी ओदिशामध्ये मोदी सर्वांत जास्त लोकप्रिय आहेत. त्यानंतर गोवा, तेलंगणाचा क्रमांक लागतो. मात्र पंजाबमध्ये मोदी सर्वांत अप्रिय नेते आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Among the poor performers Raloa's seven chief ministers, Uddhav Thackeray's performance in the state is better than that of Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.