अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'; बैठकांचं सत्र, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी केला 'मास्टरप्लान'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 19:22 IST2023-01-13T19:20:48+5:302023-01-13T19:22:24+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून शुक्रवारी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात सुरक्षा बैठक घेतली.

अमित शाह यांचे 'मिशन काश्मीर'; बैठकांचं सत्र, दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी केला 'मास्टरप्लान'
नवी दिल्ली-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून शुक्रवारी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यासंदर्भात सुरक्षा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं. अमित शाह यांनी राजौरी येथील हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलं. "खराब वातावरणामुळे काश्मीर खोऱ्यात घडलेल्या दुर्देवी घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मला जाता आलं नाही. माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे", अशी माहिती अमित शाह यांनी दिली. राजौरी जिल्ह्यातील धंगरी गावात १ जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. आज गृहमंत्री अमित शाह राजभवनावर गेले जिथं त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा बैठक झाली. यात उपराज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव एके भल्ला, आयबीचे प्रमुख आणि रॉचे प्रमुख यांच्यासोबत सीआरपीएफ, बीएसएफ तसंच पोलिसही उपस्थित होते.
शोकाकुल कुटुंबीयांनी मोठी हिंमत दाखवून दहशतवादाविरोधात लढण्याची तयारी दाखवली असल्याचं अमित शाह म्हणाले. "सुरक्षा यंत्रणांसोबतच्या बैठकीत सर्व पैलूंवर चर्चा झाली. येणाऱ्या दिवसात सुरक्षित ग्रीड तयार करण्यासंदर्भात विचार झाला आहे. बीएसएफ, सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्करसह सर्व यंत्रणा सज्ज आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचंही मनोबल वाढलं आहे. शनिवारी एनआयए आणि पोलीस या घटनेची चौकशी करतील. गेल्या दीड वर्षात जितक्या दहशतवादी घटना घडल्या आहेत. त्या सर्वांची चौकशी होईल. माहिती देणाऱ्या संस्था देखील मजबूत होतील. दहशतवादाविरोधात झीरो टॉलरेन्स नीति पुढे नेली जाणार आहे. राजौरीतील घटनेला जबाबदारी असणाऱ्यांना कडक शिक्षा केली जाईल", असं अमित शाह म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवादी घटनांमध्ये घट झाल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एका घटनेच्या आधारे खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. सुरक्षाकडं अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. राजौरी दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे, असंही शाह म्हणाले.