स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 19:56 IST2025-12-12T19:52:25+5:302025-12-12T19:56:43+5:30
Amit Shah Mohan Bhagwat, Swatantryaveer Savarkar Andaman: अंदमान आणि निकोबार बेटांमधील श्री विजयपुरम येथे भव्य पुतळ्याचे अनावरण

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
Amit Shah Mohan Bhagwat, Swatantryaveer Savarkar Andaman: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील श्री विजयपुरम येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींना उजाळा देणारा हा कार्यक्रम एक ऐतिहासिक क्षण ठरल्याचे उपस्थितांनी म्हटले. शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दक्षिण अंदमानातील श्री विजयपुरम येथे वीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. सरसंघचालक डॉ. भागवत यांनी पुतळ्याचे शिल्पकार अनिल सुतार यांना शाल देऊन सन्मानित केले.
वीर सावरकरांचे जीवन देशभक्तीचे प्रतीक
गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले, "वीर सावरकरांचे जीवन मातृभूमीवरील अपार प्रेम आणि राष्ट्रासाठी आपले जीवन अर्पण करण्याची तयारी दर्शवते. अंदमान आणि निकोबारची भूमी वीर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, समर्पण आणि धैर्याची साक्षीदार आहे. आज या पवित्र भूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासमवेत मी सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले आणि 'वीर सावरकर प्रेरणा उद्यान'चे उद्घाटन केले. हे उद्यान आणि पुतळा भावी पिढ्यांना सांस्कृतिक राष्ट्रवादाचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी वीर सावरकरांप्रमाणे दृढ राहण्यासाठी प्रेरणा देत राहील."
वीर सावरकर जी का जीवन मातृभूमि के प्रति अथाह प्रेम और राष्ट्र के लिए प्राण न्योछावर करने की प्रेरणा देता है। अंडमान और निकोबार की भूमि वीर सावरकर जी सहित अनेक स्वतंत्रता सेनानियों के त्याग, समर्पण एवं साहस की साक्षी रही है।
— Amit Shah (@AmitShah) December 12, 2025
आज इस पावन भूमि पर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के… pic.twitter.com/Y1M8zp85Id
वीर सावरकर प्रेरणा उद्यानाचे उद्घाटन
अमित शाह आणि डॉ. मोहन भागवत यांनी वीर सावरकर प्रेरणा उद्यानाचेही उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की, हे उद्यान आणि पुतळा भावी पिढ्यांना सांस्कृतिक राष्ट्रवादाचे रक्षण करण्यासाठी आणि वीर सावरकरांच्या आदर्शांचे पालन करण्यासाठी प्रेरणा देत राहील.
सावरकरांच्या काळा पाणी शिक्षेचा ऐतिहासिक संदर्भ
१९११ मध्ये ब्रिटीश सरकारने वीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली होती आणि त्यांना पोर्ट ब्लेअरमधील सेल्युलर तुरुंगात ठेवले होते. आता त्याच ठिकाणाला श्री विजयपुरम म्हणून ओळखले जाते. तिथेच हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हे ठिकाण आजही स्वातंत्र्य चळवळीच्या अमर गाथांचे प्रतीक आहे.