मोदी सरकारकडून CCSची स्थापना; अमित शहा, एस. जयशंकर यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 15:19 IST2019-06-05T15:13:50+5:302019-06-05T15:19:03+5:30
मोदी सरकारमध्ये CCS मध्ये राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामन आधीपासून आहेत.

मोदी सरकारकडून CCSची स्थापना; अमित शहा, एस. जयशंकर यांचा समावेश
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने 'कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी' (CCS) म्हणजेच सुरक्षेतेच्या मुद्द्यासांठी कॅबिनेट कमिटीची स्थापना केली आहे. या कमिटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या समावेश आहे. अमित शहा आणि एस. जयशंकर यांना पहिल्यांदाच या कमिटीत स्थान मिळाले आहे. तर राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामण यांचा मोदी सरकार -1 मध्ये असताना सुद्धा या कमिटीत सहभाग होता. देशातील सुरक्षेतेसंदर्भातील सर्व निर्णय ही कमिटी घेते.
मोदी सरकारमध्ये या कमिटीत राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामन आधीपासून आहेत. मात्र, त्यांच्याकडील जबाबदारी बदलली आहे. राजनाथ सिंह आधी गृहमंत्री म्हणून या कमिटीत होते, तर निर्मला सीतारमण संरक्षणमंत्री म्हणून होत्या. तर अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांचा समावेश समावेश होता. मात्र, आता मोदी सरकार-2 मध्ये निर्मला सीतारामण यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांसह अमित शहा आणि एस. जयशंकर यांचा या कमिटीत समावेश करण्यात आला आहे.
मोदी सरकार-2 मध्ये सुषमा स्वराज यांचा समावेश नाही
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मोदी सरकार -1 मधील कर्तव्यदक्ष मंत्री सुषमा स्वराज यांचा मोदी सरकार-2 मध्ये समावेश नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. दरम्यान, नरेंद्र मोदी सरकार हे गरजूंच्या मदतीला धावून जाणारे, झटपट कामे करणारे आणि पाकिस्तानला रोखठोक प्रत्युत्तर देणारे आहे, ही प्रतिमा निर्माण करण्यात सुषमा स्वराज यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मोदी सरकार -1 मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अनेक देशांशी मैत्रीचे संबंध जोडले. त्याचवेळी, दहशतवादाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला उघडे पाडले, त्यांना खडे बोल सुनावले आणि देशवासीयांची मनं जिंकली आहेत.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिपद नको; जेटली यांचे मोदींना पत्र
प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला नव्या सरकारमध्ये मंत्रिपद नको आहे, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. नव्या सरकारच्या शपथविधी समारंभाच्या एक दिवस आधीच जेटली यांनी हे पत्र लिहून मंत्रीपद नाकारले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जेटली यांनी मोदींना तोंडी कल्पना दिली होती. उपचारासाठी वेळ हवा असल्यामुळे आपल्याला मंत्रीपद नको, असे त्यांनी मोदींना सांगितले होते. हीच भूमिका त्यांनी आता पत्राद्वारे जाहीररीत्या मांडली होती. जेटली यांनी पत्रात म्हटले होते की, मला माझ्यासाठी तसेच माझ्या आजारावरील उपचारासाठी वेळ द्या, अशी औपचारिक विनंती मी आपणास करीत आहे. नव्या सरकारमध्ये मला कोणतीही जबाबदारी देण्यात येऊ नये. सरकार व पक्षाचे अनौपचारिक समर्थन मात्र मी करीत राहीन.