महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:57 IST2025-07-25T12:50:59+5:302025-07-25T12:57:30+5:30

उत्तर प्रदेशातील विद्यापीठामध्ये मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

Amidst the language controversy competition to learn Marathi in UP Aligarh Muslim University | महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी

(प्रातिनिधीक छायाचित्र)

UP-Bihar Students learning Marathi in AMU: राज्यात पहिली पासून हिंदी शिकवण्याचा आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा शासन निर्णय लागू झाल्यानंतर संपाताची लाट उसळली होती. राज्यात काही ठिकाणी मराठी-हिंदीचा वाद देखील पेटला होता. मात्र सरकारने यासंदर्भात शासन निर्णय मागे घेतले.  दुसरीकडे मराठीला विरोध करणाऱ्या परराज्यातील लोकांना मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात मराठी बोलता आलच पाहिजे अशी मनसेचे मागणी आहे. अशातच उत्तर प्रदेशातील एका विद्यापीठात शेकडो विद्यार्थी मराठी भाषा शिकत असल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रातील रोजगाराच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांनी मराठी विषयाचा अभ्यासक्रम निवडला आहे.  

महाराष्ट्रात सुरू असलेल्या भाषा वादात उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे. मराठी भाषा न येणाऱ्यांना मारहाण केली जात आहे. अशा वातावरणात उत्तर भारतातील विद्यार्थीही सावध झाले आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणारे उत्तर भारतीय राज्यांतील विद्यार्थी अलिगढ मुस्लीम विद्यापीठात मराठी भाषा शिकत होते. त्यांचे म्हणणे आहे की भाषा हे संवादाचे माध्यम आहे आणि तिथे गेल्यावर त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ते ही भाषा शिकत आहेत.

अलिगड मुस्लिम विद्यापीठात मराठी शिकणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. येथे सुमारे ४०० ते ४५० विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश येथील ४५० विद्यार्थी मराठी भाषेचा अभ्यास करत आहेत. यामध्ये पदवीपूर्व, पदव्युत्तर, पदविका, पीएचडीचे विद्यार्थी आहेत. मराठी शिकणाऱ्यांपैकी सुमारे ६० टक्के विद्यार्थी उत्तर प्रदेशातील आझमगढ, बस्ती, गोरखपूर, गाजीपूर, बनारस, संभल येथील आहेत. त्यापैकी बहुतेक जण मुंबई किंवा महाराष्ट्रात गेल्यानंतर भाषेची कोणतीही समस्या येऊ नये म्हणून मराठी शिकत आहेत.

 जर  महाराष्ट्रासारख्या राज्यात काम करायचे असेल तर त्या राज्याची भाषा शिकणे आवश्यक असल्याचे तिथल्या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतःची संस्कृती आणि भाषा आहे असे त्यांचे स्पष्ट मत आहे. रोजगाराच्या संधी लक्षात घेता स्थानिक भाषा जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. भाषा हे कोणत्याही क्षेत्रात संवादाचे माध्यम आहे आणि आम्ही भविष्यासाठी ते शिकत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटलं.

विज्ञान, कला, वाणिज्य, धर्मशास्त्र, आंतरराष्ट्रीय अभ्यास या विषयांच्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, बँकिंग क्षेत्रात नोकरीची तयारी करणारे विद्यार्थी, रेल्वे किंवा बॉलिवूडमध्ये अभिनयासाठी प्रयत्न करणारे तरुण देखील मराठी भाषा शिकत आहेत. महाराष्ट्रात नोकरी मिळाल्यानंतर मातृभाषेचे ज्ञान नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. नोकरीसाठी मराठीत मौखिक संवाद, भाषांतर आणि लेखन कौशल्य असणं आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणं आहे.

Web Title: Amidst the language controversy competition to learn Marathi in UP Aligarh Muslim University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.