आडवे येणाऱ्यांना संपवा ही अमेरिका, चीनची प्रवृत्ती; सरसंघचालक मोहन भागवत यांची लखनौमध्ये टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 09:26 IST2026-02-19T09:25:29+5:302026-02-19T09:26:56+5:30
लखनौ विद्यापीठाच्या मालवीय सभागृहात आयोजित ‘शोधार्थी संवाद’ कार्यक्रमात ते म्हणाले की, पाश्चात्त्य व अन्य काही देश कट्टरतावाद पसरवतात.

आडवे येणाऱ्यांना संपवा ही अमेरिका, चीनची प्रवृत्ती; सरसंघचालक मोहन भागवत यांची लखनौमध्ये टीका
लखनौ : आपल्या मार्गात येणाऱ्यांना संपवण्याची अमेरिका, चीनची प्रवृत्ती आहे अशी टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी केली. तसेच जगासमोरील अनेक आव्हानांचे उपाय भारताकडे आहेत, अ त्यांनी सांगितले.
लखनौ विद्यापीठाच्या मालवीय सभागृहात आयोजित ‘शोधार्थी संवाद’ कार्यक्रमात ते म्हणाले की, पाश्चात्त्य व अन्य काही देश कट्टरतावाद पसरवतात. शक्तिशाली व्हायचे, स्वतःपुरते जगायचे आणि इतरांना एकाकी पाडायचे, तसेच आडवे येणाऱ्यांना संपवायचे, ही त्यांची विचारसरणी आहे. आज अमेरिका आणि चीन हेच करत आहेत. हे देश कट्टरतावादही पसरवत आहेत. भारताला विश्वगुरू व्हायचे असेल, तर सर्व क्षेत्रांत शक्तिशाली व्हावे लागेल. जग हे शक्तीच्या पाठबळाशिवाय सत्यावर विश्वास ठेवत नाही.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
स्वायत्ततेसाठी संघर्ष
सरसंघचालक म्हणाले की, भारताची दिशा आणि स्थिती बदलण्यात संशोधनाची मोठी भूमिका आहे. सत्य माहिती प्रकाशात आणली पाहिजे. संशोधकांनी निःस्वार्थ भावनेने काम करावे. जे काही संशोधन कराल, ते उत्कृष्ट पद्धतीने, प्रामाणिकपणे करा असे आवाहन त्यांनी केले.
त्यांनी सांगितले की, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजा आहेत. त्या क्षेत्रांचा व्यवसाय होता कामा नये. शिक्षण व आरोग्य सुविधा सर्वांना सुलभरीत्या उपलब्ध व्हाव्यात. ब्रिटिशांनी जे चुकीचे केले ते दुरुस्त केले पाहिजे.
‘देश समृद्ध करणे हेच संघाचे ध्येय’
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणतो.
म्हणजे संपूर्ण जग हे आपले कुटुंब आहे. जोपर्यंत सर्वजण सुखी नाहीत, तोपर्यंत कोणीही सुखी राहू शकत नाही. त्यामुळे आपले जीवन संयमी असावे, उपभोगवादी नसावे. देश समृद्ध करणे हे संघाचे ध्येय आहे. ‘मी आणि माझे कुटुंब’ एवढ्यापुरता विचार न करता संपूर्ण राष्ट्राचा विचार करावा. संघाला समाजाची एकता आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे. संपूर्ण हिंदू समाजाची एकजूट करणे हे संघाचे कार्य आहे.