'त्यांनी मला तुला कोणी पाठवलं विचारलं आणि मारलं'; करूर चेंगराचेंगरीत रुग्णवाहिका चालकांवर हल्ला, पोलिसांकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 19:56 IST2025-10-05T19:51:17+5:302025-10-05T19:56:32+5:30
तमिळनाडूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात पोलिसांनी रुग्णवाहिका चालकांचीही चौकशी केली.

'त्यांनी मला तुला कोणी पाठवलं विचारलं आणि मारलं'; करूर चेंगराचेंगरीत रुग्णवाहिका चालकांवर हल्ला, पोलिसांकडून चौकशी
Karur Stampede: तमिळनाडूतील करूर येथे टीव्हीके नेते विजय याच्या निवडणूक रॅलीदरम्यान झालेल्या हिंसक अपघातानंतर पोलिसांनी शनिवारी रुग्णवाहिका चालकांची चौकशी केली. या अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. या भीषण घटनेनंतर अभिनेता विजय याचा पक्ष आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप करत आहेत. करूर चेंगराचेंगरीदरम्यान अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी गर्दीत धावणाऱ्या रुग्णवाहिका चालकाची तामिळनाडू पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान, या चालकाने चेंगराचेंगरीनंतर त्यांना दिलेल्या त्रासाबद्दल भाष्य केलं. चेंगराचेंगरीदरम्यान अनेक रुग्णवाहिका चालकांवरही हल्ला करण्यात आला होता.
२७ सप्टेंबर रोजी करूर येथे अभिनेता आणि तमिळगा वेत्री कझगमचा संस्थापक विजय यांच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ४१ लोक ठार झाले. यापूर्वी चेंगराचेंगरीनंतर एका रुग्णवाहिका चालकाला त्याच्या गाडीतून बाहेर काढून मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. जमावाने लोकांना पांगवण्यासाठी रिकामी रुग्णवाहिका गर्दीत पाठवण्यात आली होती असा दावा केला होता. एआयएडीएमकेचे सरचिटणीस के. पलानीस्वामी यांनी गर्दी पांगवण्यासाठी निवडणूक प्रचारात रिकाम्या रुग्णवाहिका पाठवण्यात आल्याचा आरोप केला. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला.
दुसरीकडे टीव्हीकेच्या नेतेही सातत्याने हेच आरोप करत आहेत, त्यामुळे जिल्हा पोलिसांनी एसआयटी चौकशीपूर्वी रुग्णवाहिका चालकांना चौकशीसाठी बोलावले होते. यामध्ये स्थानिक रुग्णवाहिका चालक सूर्याचाही समावेश होता. सूर्याने महिला आणि मुलांसह लोकांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला आणि तरीही त्याच्यावर हल्ला झाला. "त्यांनी माझ्या गाडीची कागदपत्रे मागितली आणि तुला कोणी फोन केला, या घटनेची माहिती कशी मिळाली, असं विचारलं. मी त्यांना पोलिसांनी मला फोन केला होता असं सांगितले आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्या दिवशी माझ्या चार माणसांवर हल्ला झाला. आम्ही अनेकांचे जीव वाचवले," असं सूर्याने सांगितले.
ज्या रुग्णवाहिका चालकांवर हल्ला झाला त्यांना भरपाई जाहीर करण्यात आली नाही याबद्दलही सूर्याने नाराजी व्यक्त केली. "माझ्या टीमने त्या रात्री खूप मेहनत घेतली, रुग्णांना रुग्णालयात परत आणण्यासाठी बेशिस्त गर्दीचा सामना केला. आम्हाला बराच वेळ जेवणही मिळाले नाही. एका ड्रायव्हरने सीपीआर देऊन एका मुलाचा जीवही वाचवला," असंही सूर्याने सांगितले.